‘माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात काय ते कळेल’, या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा युतीच्या चर्चांणा उधाण आलं आहे. त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमीत्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणाची सुरुवातीलाच भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून अप्रत्यक्षपणे निमंत्रण दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनतर आता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही एकत्र येण्याचे संकेत दिल्याने चर्चा सुरु झाली आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुंबईत एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. असेच भेटत राहिलो तर महाराष्ट्राचा विकास निश्चित आहे असं वक्तव्य सुभाष देसाई यांनी केलं आहे. तर आमच्या वक्तव्यावरुन पुढच्या राजकारणाची दिशा ओळखा असं सूचक वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

“या आठवड्यात दोनदा मी रावसाहेब दानवेंना भेटलोय. निर्यात वाढवण्यासाठी आम्ही भेटी घेत आहोत. मी मानतो की निर्यातीबरोबर रावसाहेब दानवे यांच्यासोबत आमची भेट अशीच सुरु राहिली तर देशाची आणि महाराष्ट्राची प्रगती नक्कीच होईल,” असे मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

“जनतेने आम्हाला दोघांना बहुमत दिलं आहे. जनतेच्या मताच्या विरुद्ध वागणे हे कोणालाही महाग पडणार आहे. म्हणून हळूहळू असं बोलायला सुरुवात झाली आहे. तिकडे ते तिघे कोणती भाषा वापरती जाते आणि आम्ही दोघे कोणती भाषा वापरतो यावरुन भविष्यातील राजकारणाची कोणती दिशा आहे हे तुम्हाला लक्षात येईल,” असे रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी – मुख्यमंत्री

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली.

“व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मातांनो.., असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे पाहिलं तेव्हा व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे देखील उपस्थित होते.