गरबा खेळून घरी परतणाऱ्या एका ११ वर्षाच्या मुलीवर टेम्पो चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत साकीनाका परिसरात घडली आहे. पीडित मुलगी आणि तिचा ११ वर्षांचा मित्र दोघे गरबा खेळून झाल्यानंतर घराच्या दिशेने येत असताना मंगळवारी रात्री ही घटना घडली.

पोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर आरोपी सिराज मेहंदी हसन खान (३०) याने अटक टाळण्यासाठी त्याचे फॅशनेबल केसही कापले पण पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीला त्याच्या साकीनाका येथील घरातून अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल फोन जप्त केला आहे. गुन्हा करण्यापूर्वी त्याने अल्पवयीन मुलीचे काही फोटो काढले होते.

दोन्ही मुल त्यांच्या घरापासून काही अंतरावर दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे गरबा खेळण्यासाठी गेले होते. पीडित मुलगी सातव्या इयत्तेत आहे. आरोपीकडे पूर्णवेळ नोकरी नव्हती. टेम्पो चालक म्हणून तो पार्ट टाइम काम करायचा. घटनेच्या दिवशी आरोपीने अंमलीपदार्थाचे सेवन केले होते.

आरोपीने दोन्ही मुलांचा पाठलाग केला. दोन्ही मुले रस्त्यावर निर्जन स्थळी पोहोचल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या मित्रावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या मुलाने तिथून पळ काढला. त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार बलात्कार केला. १०.३० च्या सुमारास त्याने मुलीची सुटका केली असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. पीडित मुलीने घरी आल्यानंतर तिच्या आईला सर्व घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर आईने तिला घेऊन तडक पोलीस ठाणे गाठले व तक्रार नोंदवली. आईने मला घरी यायला उशीर का झाला ? असे विचारले त्यावेळी मी तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली.

माझ्याबरोबर जे झाले त्याने मी प्रचंड घाबरून गेले होते. पण मी कशीबशी घरी पोहोचले. त्या माणसाने मला धमकावले व माझे आणि माझ्या मित्राचे त्याने फोटो काढले. त्याने माझ्या मित्राच्या कानशिलात लगावून तिथून निघून जाण्यास सांगितले. बलात्कारानंतर त्याने तोंड बंद ठेवण्यासाठी मला धमकावले होते असे पीडित मुलीने तिच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

मुलीने दिलेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी आरोपीला अटक केली. पीडित मुलगी आणि तिच्या मित्राने आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यास पोलिसांना मदत केली. आरोपीने अटक टाळण्यासाठी त्याचे केसही कापले पण आम्ही त्याला अटक केली असे पोलिसांनी सांगितले. आरोपी विरोधात कलम ३७६,३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सिराजसह १६ जणांना ताब्यात घेतले होते.