मुंबई : गेल्या अनेक वर्षांत चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पालिकेने कुठल्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही. परिणामी, या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून उद्यानात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. आसपासच्या परिसरातील रहिवासी उद्यानातच वाहने उभी करीत आहेत.
तीन हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात हे एकमेव उद्यान आहे. काही वर्षांपूर्वी परिसरातील अनेक लहान मुले या उद्यानात खेळायची. मात्र गेल्या काही वर्षांत पालिकेने या उद्यानात दुरुस्तीच केलेली नाही. परिणामी, उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानाची सुरक्षा भिंत पूर्णपणे तुटली आहे. उद्यान गर्दुल्ले आणि दारुडय़ांचा अड्डा बनला आहे. उद्यानातील झाडांना वेळेवर पाणी घालण्यात येत नसल्याने अनेक झाडांची वाताहात होऊ लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उद्यानात साफसफाई झालेली नाही. उद्यानात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही स्थानिक रहिवासी या उद्यानातच आपली वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे उद्यानाला वाहनतळाचे रूप आले आहे. या उद्यानाची तातडीने दुरुस्ती करावी आणि मुलांना खेळण्यासाठी ते उपलब्ध करावे, अशी मागणी रहिवाशांकडून होऊ लागली आहे.