करोना चाचण्यांच्या संच (किट) निर्मितीसाठी अनेक स्थानिक कंपन्यांना परवानगी दिली असून चाचण्यांचे विविध पर्यायही खुले झाल्याने खासगी प्रयोगशाळांचे चाचणी दर कमी करण्याच्या सूचना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) राज्य सरकारला केली आहे.

करोना साथीच्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संच आयात केले जात होते. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांसाठी ४ हजार ५०० रुपये प्रतिचाचणी कमाल दर ठरविले होते. परंतु गेल्या महिनाभरात अनेक स्थानिक कंपन्या संच निर्मिती करत आहेत. तसेच आयसीएमआरच्या १६ केंद्रांवरून संच उपलब्ध केले जात आहेत.खासगी प्रयोगशाळांचे कमाल दर  साडेचार हजारांपर्यंत ठेवण्याची आवश्यकता नाही. हे दर कमी करण्यासाठी सरकारने यांच्याशी चर्चा करावी, असे आयसीएमआरने सूचित केले आहे.

पालिकेसाठी चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांना प्रतिचाचणी साडेतीन हजार रुपये दिले जातात. मात्र खासगी चाचणी करून घेण्यासाठी मुंबईकरांना साडे चार हजार रुपयेच मोजावे लागत आहेत.

आयसीएमआरच्या सूचना अस्पष्ट असून चाचणीच्या संचांची संख्या, किमती ही माहिती पार्दशक असल्यास सरकारला त्याप्रमाणे कंपन्यांशी दर ठरविण्यास मदत होईल.  तसेच खासगी पद्धतीने चाचण्या करणाऱ्या व्यक्तींनाही याचा फायदा होऊ शकेल, असे ऑल इंडिया ड्रग अक्शन नेटवर्कने मांडले आहे.

मेट्रोपोलीस, थायरोकेअरला चाचणीमागे अडीच हजार रुपये

मेट्रोपोलीस आणि थायरोकेअर या खासगी प्रयोगशाळांचा आपली चिकित्सा योजनेअंतगर्त समावेश करत पालिकेने प्रतिचाचणी अडीच हजार रुपये असे नवे दर लागू केले आहेत.पालिकेकडून रुग्ण खासगी रुग्णालयात पाठविल्यासही या प्रयोगशाळांना प्रतिचाचणी अडीच हजार रुपये आकारण्याची मुभा असेल.