धर्मातरानंतरही जुन्या संस्कृती, परंपरांचा आदर; मुंबई विद्यापीठाचे संशोधन
धारावी कोळीवाडय़ातील कोळी समाजातील नागरिकांमध्ये अनोख्या धर्मबंधाचा उलगडा झाला असून येथे राहत असलेल्या ख्रिश्चन धर्माच्या कोळी समूहात ‘मरियम व येशू’ या ख्रिश्चन देवतांबरोबरच ‘एकविरा, खंडोबा, भैरव’ आदी हिंदू देवतांचेही पूजन करण्यात येत आहे. दोन्ही धर्माचे लग्नाचे विधीही सारखेच असून त्यांच्यात रोटी-बेटीचे व्यवहारही होतात. आश्चर्य म्हणजे मुंबईतील अन्य ख्रिश्चन व हिंदू धर्मीय कोळ्यांमध्ये असे संबंध जोपासले जात नसल्याने ही धार्मिक एकता विशेष असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून सुरू असलेल्या संशोधनात दिसून आले.
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागामार्फत सध्या मुंबईच्या विविध भागात मुंबई-साष्टीच्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन करण्यात येत आहे. बहि:शाल विभागाच्या संचालिका डॉ. मुग्धा कर्णिक, माहिती प्रकल्पाचे संशोधक डॉ. सूरज पंडित, डॉ. कुरूश दलाल, डॉ. अभिजीत दांडेकर, डॉ. प्राची मोघे, ‘लोकप्रभा’चे संपादक विनायक परब आदी संशोधकांचा या शोधनकार्यात समावेश आहे. यात धारावी परिसरात डॉ. प्राची मोघे आणि त्यांचे सहकारी संशोधन कार्य करत असून त्यांनी सांगितल्याप्रमाणे, धारावीत १७ व्या शतकापासून कोळी समाजाचे वास्तव्य असल्याचे पुरावे आढळतात. येथील कोळी समाज हा ‘सोनकोळी’ समाज म्हणून ओळखला जात असून पोर्तुगीजांच्या मुंबईतील आगमनानंतर यातील अनेक कोळी कुटुंबीयांना त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावला होता. त्यामुळे आज जवळपास चारशे ते साडेचारशे वर्षे येथे ख्रिश्चन व हिंदू असे भिन्नधर्मीय कोळी समाज राहतात. मात्र, संशोधनात आम्हाला त्यांच्या धार्मिक वेगळेपणातही समानतेचे अनेक दुवे आढळले.
या सोनकोळ्यांतील भगतांच्या कुटुंबीयांत एकविरा, खंडोबा, भैरव आदींचे टाक पुजले जातात. मात्र, येथील ख्रिश्चन धर्मीय सिल्वेस्टर जोसेफ कोळी यांच्या घरात त्यांची ख्रिश्चन देवता ‘मरियम’च्या पूजेबरोबरच एकविरा, खंडोबा, भैरव आदींचीही विधिवत पूजा केली जाते. खंबा देव, केरे देव, वेताळ देव, हबशा देव या चार देवांची मंदिरे येथे असून १७५० सालापासून ती धारावीत आहेत. गावाच्या पूर्वीपासूनच्या या चतु:सीमा असून यातील खंबा देव हा लंबू बुध्या भगत या ख्रिश्चन कोळ्यास धारावी खाडीत सापडला होता. त्याचीही आता या कोळ्यांकडून पूजा करण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोटी-बेटीचेही व्यवहार
धारावी गावातील हिंदू व ख्रिश्चन धर्मीय कोळ्यांत आपसांत रोटी-बेटीचेही व्यवहार केले जातात. विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातील कोळ्यांमध्ये लग्न व साखरपुडय़ाचे विधी हे हिंदू धर्मीय कोळ्यांप्रमाणेच असून हे विधी ख्रिश्चन धर्मगुरूंकडूनच करण्यात येतात. यात हिंदू कोळी धर्मीयांमध्ये लग्नात करण्यात येणारा ‘उंबराच्या पाण्याचा विधी’ हा ख्रिश्चन कोळ्यांमध्येही करण्यात येतो. यातील वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे मुंबईतील अन्य कोळीवाडय़ांमध्ये मात्र ख्रिश्चन व हिंदू समाजात असे एकमेकांच्या देवी-देवतांचे पूजन आणि एकत्र लग्न समारंभ केले जात नसल्याचेही संशोधनात आढळले. दोन्ही धर्माचा सुवर्णमध्य साधत दोन संस्कृतींना एकत्र पुढे नेण्याचे कार्य धारावीत सुरू असून ही चांगली बाब आहे, असे या गटातील संशोधक अनुराधा परब यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religion bond between hindu christian and fishermen in dharavi
First published on: 27-07-2016 at 01:57 IST