Republic Day 2023 : राज्यपालांचं जनतेला उद्देशून भाषण; म्हणाले, "महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची...!" | republic day 2023 maharashtra aims to achieve one trillion dollar economy governor koshyari | Loksatta

Republic Day 2023 : राज्यपालांचं जनतेला उद्देशून भाषण; म्हणाले, “महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची…!”

Republic Day 2023 Updates : “सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा.” असे आवाहनही केले आहे.

Governer Koshyari, Republic Day 2023 News Updates
प्रजासत्ताक दिन २०२३

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात भाषण केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विकास कामे, राज्य सरकारच्या योजनांसह कार्याची माहिती दिली.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सर्वप्रथम मी देशाच्या प्रजासत्ताकाच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारक यांना मी विनम्र अभिवादन करतो.

सामाजिक-आर्थिक लोकशाहीचा अमृतकाळ

यानंतर राज्यपालांनी पुढे सांगितले की, “माझ्या शासनाने नुकताच मुंबई ते नागपूर या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या सातशे एक किलोमीटर लांबीपैकी नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पाचशे एकवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण करुन हा रस्ता वाहतुकीस खुला केला आहे. चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जोडले गेले आहेत.मुंबई तसेच नागपूर, पुणे, ठाणे भागातील मेट्रो मार्गांची कामे दर्जेदार आणि जलद गतीने करण्यात येत आहेत. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच मेट्रो मार्ग दोन अ आणि मेट्रो मार्ग सात वरील दुसरा टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मेट्रो मार्ग एक, दोन अ आणि सात हे परस्पर एकमेकांशी जोडले गेल्यामुळे मुंबईला पहिले मेट्रो नेटवर्क मिळाले आहे. युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पंचाहत्तर हजार रिक्त पदे भरत असून नुकतीच याची सुरुवातही करण्यात आली आहे. राज्यातील अठरा हजार तीनशे एकतीस पोलीस शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत. विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये शेहचाळीस हजार एकशे चौपन उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला. स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दहा हजार रुपये वाढ केली असून आता ते वीस हजार रुपये इतके करण्यात आले आहे. पाच हजार चारशे सहा स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ होणार आहे.”

नक्की पाहा – PHOTOS : प्रजासत्ताकदिनी ‘कर्तव्य’पथावरील आकर्षक चित्ररथांद्वारे घडलं देशातील नारीशक्ती, पर्यटन आणि संस्कृतीचं अनोखं दर्शन! 

याचबरोबर, “आणिबाणीच्या काळात लढा दिलेल्या व्यक्तींचा देखील सन्मान / गौरव करण्याबाबतची योजना पुन्हा नव्याने सुरु करण्यात आली आहे. माझ्या शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग’ या नवीन स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजनेतील सुमारे एक कोटी छप्पन्न लाख शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त माझ्या शासनाने चार शिधा – जिन्नसांचा समावेश असलेल्या ‘आनंदाचा शिधा’ संचाचे फक्त शंभर रुपये इतक्या माफक दराने वितरण केले आहे.” अशई माहिती राज्यपालांनी दिली.

पंतप्रधान मोदी आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सीसी यांच्यात द्विपक्षीय चर्चा; दोन्ही देश धोरणात्मक भागीदारीस नव्याने पुढे नेणार

याशिवाय “सन दोन हजार सव्वीस – सत्तावीस पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या देशाच्या उद्देशास सुसंगत असे एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य महाराष्ट्राने ठेवले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळ उपसमितीने सत्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या आणि एकसष्ठ हजार चाळीस रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या एकूण चोवीस प्रकल्पांना मान्यता दिली आहे. मराठवाडा आणि विदर्भात सत्तेचाळीस हजार आठशे नव्वद रोजगार निर्मितीसह शेहचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले असून ते एकूण प्रस्तावित गुंतवणूक आणि रोजगाराच्या निम्म्याहून अधिक आहे. नुकताच दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेतही एक लाख सदतीस हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आल्याने गुंतवणूकदारांचा राज्यावरील विश्वास प्रकट झाला आहे. महाराष्ट्राने G20 ची बैठक मुंबई आणि पुणे येथे नुकतीच यशस्वीरित्या आयोजित केली. नागपूर आणि औरंगाबाद येथेही G20 च्या बैठका होणार आहेत. राज्यात दोनशे कोटी रुपयांच्या तरतुदीसह ‘महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान’ सुरू करण्यात आले आहे.” असंही राज्यपाल म्हणाले.

Republic Day 2023 : “…तर हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावंच लागेल”, शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी माझे शासन काम करीत आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा असे आवाहन करतो व सर्वांना पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 10:25 IST
Next Story
धक्कादायक! भिवंडीत तीन वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून निर्घृण हत्या; तीन दिवसांतील दुसरी घटना