शतकातील सर्वात मोठय़ा संशोधनाच्या मोहिमेतील संशोधिका अर्चना पई यांची भावना
‘गुरुत्व तरंगांचे अस्तित्व सुस्पष्ट करणारा आणि द्वैती कृष्णविवरांचे अस्तित्वही सिद्ध करणारा तो क्षण अत्यानंदाचा आणि आत्यंतिक समाधान देणारा होता’, असे उद्गार डॉ. अर्चना पई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना काढले.
शतकातील सर्वात महत्त्वाच्या खगोलशास्त्रीय शोधमोहिमेत- ‘लायगो सायंटिफिक प्रोग्राम’मध्ये ज्या भारतीय वैज्ञानिकांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यात बिनीचा वाटा मूळच्या मुंबईकर असलेल्या मराठमोठय़ा डॉ. अर्चना पई यांचाही आहे. ज्या ९ भारतीय विज्ञान संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या, त्यांच्या प्रमुख विश्लेषकांमध्ये त्या एकमेव महिला वैज्ञानिक आहेत.
भारतातील जे निवडक वैज्ञानिक ‘गुरुत्वीय तरंग’ या विषयावर आधीपासून संशोधन करीत होते, त्यांनी २००९ मध्ये ‘इंडिगो’ हा गट स्थापन केला आणि या गटाने ‘आम्हालाही लायगो संशोधन उपक्रमात सहभागी व्हायचे आहे,’ असे लायगोला कळवले. २०१२ साली ‘इंडिगो एलएससी’ अंतर्गत भारतातील ९ विज्ञान संस्था या मोहिमेत सहभागी झाल्या. त्यात आयसर त्रिवेंद्रम, आयसर कोलकाता, आयसर चेन्नई, आयुका, आयपीआर प्लाझ्मा रिसर्च, टीआयएफआर मुंबई, आयसीटीएस- टीआयएफआर बंगळुरू, आरआरसीएटी, आयआयटी गांधीनगर या संस्थांचा सहभाग होता. यातील काही संस्था या इन्स्ट्रमेन्टेशनसंबंधी, तर काही मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणाचे काम करीत होत्या. या मोहिमेत भारतीय वैज्ञानिकांची मोट बांधण्यात आयुकाचे डॉ. संजीव धुरंदर आणि बंगळुरूच्या रामन इन्स्टिटय़ूटचे डॉ. बाला अय्यर यांचे लाखमोलाचे योगदान आहे. डॉ. धुरंदर यांनी माहितीचे विश्लेषण आणि डॉ. अय्यर यांनी बायनरी स्रोताची दिशा शोधणारी सिग्नल यंत्रणा विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली असल्याचेही डॉ. पई यांनी सांगितले.
‘लायगो’च्याच धर्तीवर गुरुत्व तरंगाच्या संशोधनासाठी युरोपात जी वर्गो प्रणाली विकसित करण्यात आली होती, त्यातही डॉ. अर्चना यांचा खारीचा वाटा आहे. गुरुत्वीय लहरींवर गेली १८ वर्षे काम करणाऱ्या डॉ. अर्चना पई २००२-२००३ दरम्यान फ्रान्समध्ये आणि त्यानंतर २००६ पर्यंत रोममध्ये वर्गो प्रणालीसोबत काम केले होते. २००९ साली त्या भारतात परतल्या आणि आयसर- त्रिवेंद्रम येथील स्कूल ऑफ फिजिक्समध्ये प्राध्यापक आणि संशोधक म्हणून रुजू झाल्या. डॉ. अर्चना पई या दहावीत गुणवत्ता यादीत चमकल्या होत्या. दादरच्या रुपारेल महाविद्यालयातून पदार्थविज्ञानशास्त्रातून बीएस्सी केल्यानंतर आयआयटी- मुंबईमधून त्यांनी एमएस्सी केले. त्यानंतर पुण्याच्या आयुकामध्ये त्यांनी १९९६ ते २००१ दरम्यान ‘गुरुत्व तरंग’ या विषयावर संशोधन केले. २००५ ते २००७ दरम्यान त्यांना जर्मनीच्या अल्बर्ट आइन्स्टाइन संस्थेत संशोधनाची संधी प्राप्त झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात अद्ययावत साधन
अत्यंत कमकुवत असणाऱ्या गुरुत्वीय लहरींचे मापन करण्यासाठी बनविण्यात आलेले लायगोचे अद्ययावत व्हर्शन म्हणजे मानवाने आजमितीस बनवलेले सर्वात अद्ययावत साधन मानायला हवे असे सांगतानाच डॉ. पई म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने जागतिक असलेल्या या मोहिमेत कुठेही स्पर्धा नव्हती. माहितीच काय, कोडस्चेही आदानप्रदान होत होते. ‘विश्वाचे आर्त’ उलगडणाऱ्या या शास्त्राचे स्वरूपच असे होते की, जिथे आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य आवश्यक होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Researchers archana pai feelings about gravity wave
First published on: 14-02-2016 at 01:07 IST