भिवंडी येथील मानकोली-अंजूर फाटय़ाजवळ गुरुवारी सकाळी भरधाव टेम्पोने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामधून कामावर जात असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. तसेच या घटनेनंतर टेम्पोचालक पळून गेला. उमेश भरत सिंग (२८, रा. अंजूरफाटा, भिवंडी), पवनकुमार रामआसरे विश्वकर्मा (२८, रा. दिघा, नवीमुंबई) आणि पद्नम राशी पदान (२७, रा. दापोडा, भिवंडी), अशी यातील मृतांची नावे असून हे तिघे दापोडा भागातील  गोदामांमध्ये काम करीत होते. अशोक सीताराम यादव (२४) असे यातील जखमी रिक्षाचालकाचे नाव असून त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.