लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यासाठी आधी रस्त्यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्याकरीता अभियंत्यांनी रस्त्यावरून दुचाकीने फिरावे आणि खड्डे कुठे आहेत ते बघावे, असे निर्देश पालिका प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होत असते. दरवर्षी खड्डे भरण्याच्या कामामध्ये नवनवीन प्रयोग होत असतात. पावसाळा अगदी तोंडावर आला असून दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या समस्या मुंबईकरांना यंदा भेडसावू नयेत म्हणून प्रशासनाने यंदाही विशेष नियोजन केले आहे. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये पालिकेने ६००० कोटींची कामे दिली होती. मात्र त्यातील शहर विभागातील कामे सुरुच झालेली नाहीत. तर उपनगरातील कामेही धीम्या गतीने सुरू आहेत.

आणखी वाचा-मुंबई : पालिका आयुक्तांनी केली नालेसफाईची पाहणी

रस्ते कॉंक्रीटीकरणाचा वेग मंदावलेला असल्यामुळे खड्डेमुक्त रस्ते हे स्वप्न दूरच राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही रस्त्यावर खड्डे पडू नयेत किंवा ते वेळीच बुजवले जावे याचे पथ्य पाळताना पालिका प्रशासनाची कसोटी लागणार आहे. जे रस्ते हमी कालावधीत आहेत त्या रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी कंत्राटदारावरच असली तरी उर्वरित रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या आधीच मुंबईतील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या वांरवार आढावा बैठका होत असून त्यातही खड्ड्यांच्या सर्वेक्षणावर भर दिला जात आहे.

हे सर्वेक्षण करताना अभियंत्यांनी रस्त्यावरून दुचाकीने फिरावे असे निर्देश पालिका अधिकाऱ्यांनी दिले आहेत. चार चाकी गाडीतून खड्डे लक्षात येत नाहीत, त्यामुळे हे पथ्य पाळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खड्डा लहान असतानाच बुजवला तर तो मोठा खड्डा होणार नाही हे ओळखून वेळेत खड्डे बुजवावे असेही निर्देश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा-नालेसफाई ९९ टक्के झाल्याचा पालिकेचा दावा, आरोप-प्रत्यारोपांना ऊत

तसेच खड्डयांच्या तक्रारींसाठी गेल्यावर्षीपर्यंत असलेले सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. खड्ड्यांची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला कमीतकमी त्रास होईल, त्याला कमीत कमी माहिती द्यावी लागेल अशा पद्धतीने सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच तक्रार आल्यानंतर चोवीस तासात खड्डे बुजवले जातील याची खातरजमा करावी, असेही निर्देश देण्यात आले आहे.