लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नालेसफाईवर राजकीय पक्षांनी पालिका प्रशासनावर टीकांचा भडीमार केल्यानंतर पालिका प्रशासन वेगाने कामाला लागले आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरूवारी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. आढावा बैठकीत दिलेल्या आदेशानुसार कामांना वेग देण्यात आला आहे किंवा कसे, याची तपासणी करण्यासाठी गगराणी यांनी अचानक भेट देवून वाकोला नदी आणि मिठी नदीतून गाळ उपसा करण्याच्या कामाची पाहणी केली.

दोनच दिवसांपूर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या कामाबाबत असमाधान व्यक्त केले असून नालेसफाईच्या कामांचा जो वेग आहे तो कमी असून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल की नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तसेच पालिका आयुक्तांनी स्वत: पाहणी करावी असे आवाहनही केले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांनी मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली व नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला. परिमंडळाचे उप आयुक्त, सहायक आयुक्त यांनी दररोज सकाळ, सायंकाळी विभागात प्रत्यक्ष कार्यस्थळी भेटी देऊन पाहणी करावी, असेही निर्देश दिले. त्यानंतर गुरुवारी स्वत: आयुक्तांनीच मिठी नदी आणि वाकोला नदी येथील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. यावेळी उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) सचदेव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-नालेसफाई ९९ टक्के झाल्याचा पालिकेचा दावा, आरोप-प्रत्यारोपांना ऊत

महानगरपालिका आयुक्तांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथे वाकोला नदीवरील पुलावरून वाकोला नदीतील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. यानंतर त्यांनी मिठी नदी जंक्शन येथून मिठी नदीतील गाळ उपसा आणि नदी रुंदीकरण, संरक्षक भिंत बांधणी इत्यादी कामांची देखील पाहणी केली. नदीच्या काठावरील बांधकामांमुळे नदीचे रुंदीकरण रखडल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी सांगितले. तेव्हा न्यायालयाकडून याविषयी आदेश प्राप्त करून सदर बांधकामे निष्कासित करावीत, पात्र/अपात्रता तपासून पुनर्वसनाची कार्यवाही करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले.

आणखी वाचा-रेल्वे परिसरातील कल्व्हर्ट साफ केल्याचे प्रमाणित करा, पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी भेटी देऊन गाळ उपसा कामांची पाहणी केली. वांद्रे पश्चिम येथील एसएनडीटी नाला, अंधेरी पश्चिम येथील रसराज नाला, अंधेरी भुयारी मार्ग, गोरेगाव पश्चिम मधील वालभट नदी, मालाड भुयारी मार्ग, कांदिवली येथे पोईसर नदी, बोरिवली पूर्व येथे रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे कल्वर्ट, दहिसर येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ एस. एन. दुबे रस्त्यावर एमएमआरडीए मार्फत मेट्रो प्रकल्प अंतर्गत पर्जन्य जलवाहिनीची सुरू असलेली कामे इत्यादींची डॉ. शिंदे यांनी पाहणी केली.