लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पावसाळा अजून सुरू झाला नसला तरी मुंबईतील नालेसफाईवरून आरोपांचा पाऊस पडू लागला आहे. यंदा नालेसफाई किती टक्के झाली हे प्रशासनाने जाहीर केलेले नसले तरी पालिकेच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार आतापर्यंत तब्बल ९९ टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात नालेसफाई ४५ टक्केसुद्धा झालेली नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.

मुंबई महापालिकेत गेली दोन वर्षे प्रशासक असून यंदाच्या पावसाळ्यात प्रशासनाचीच कसोटी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईत दरवर्षी अनेकदा पावसाळ्यात पाणी तुंबते, लोकल गाडया बंद पडतात, मुंबई ठप्प होते. त्यामुळे पहिल्या पावसातच नालेसफाईच्या कामांचा निकाल लागतो. मुंबईतील नालेसफाई हा राजकीय मुद्दा देखील बनतो. त्यामुळे राजकीय पक्षांचे या नालेसफाईच्या कामांवर लक्ष असते. यंदा निवडणुकांमुळे मुळातच नालेसफाईचे काम काहिसे रखडले. त्यातच पाऊसही लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता नालेसफाईवरून वातावरण तापू लागले आहे.

आणखी वाचा-रेल्वे परिसरातील कल्व्हर्ट साफ केल्याचे प्रमाणित करा, पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश

किती टक्के गाळ काढला हे केवळ गाळाच्या वजनाचे प्रमाण आहे. खरेतर नाल्यातील प्रवाह सुरळीत झाला का हे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे गाळाचे उद्दीष्ट्य पूर्ण झाले असले तरी तरंगता कचरा कंत्राटदाराने वारंवार काढणे अपेक्षित आहे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. भूमिगत गटाराच्या मुखाजवळील गाळ काढलेला असला तरी दोन गटाराच्या मधील अंतर स्वच्छ झाले आहे की हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे १०० टक्के गाळ काढला तरी पाऊस पडेपर्यंत पुन्हा पुन्हा स्वच्छता करावी आणि अधिकाऱ्यांनी रोज रस्त्यावर उतरून पाहणी करावी असेही निर्देश देण्यात आली आहे. -अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त

पालिकेच्या आकडेवारीनुसार

एकूण नालेसफाई – ९९.९७ टक्के
शहर – ९७.२१ टक्के
पूर्व उपनगर – ९३.७७ टक्के
पश्चिम उपनगर – ९५.६१ टक्के
मिठी नदी – ९४.८३ टक्के
छोटे नाले – १०० टक्के

मुंबईतील मोठे नाले, लहान नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी सुमारे ६८९ किमी आहे. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले, १५०८ लहान नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यातून हे पावसाचे पाणी वाहत असते.

आणखी वाचा-आशिष शेलार यांनी केली मोगरा आणि इर्ला नाल्याची पाहणी

निवडणूकीमुळे नालेसफाईची कामे रखडली, आमदार रईस शेख यांचा आरोप

नालेसफाईची आकडेवारी खोटी असल्याचा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केल्यानंतर दुसऱ्यादिवशी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही प्रशासनावर टीका केली. नालेसफाईची कामे धीम्या गतीने होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यातच गुरुवारी आमदार व माजी नगरसेवक रईस शेख यांनीही प्रशासनावर टीका केली. मुंबई महानगरपालिकेचे बहुतेक अधिकारी- कर्मचारी नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर होते. त्यामुळे यंदा नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झालेली नाहीत. परिणामी, मुंबई शहरात या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामांचा आढावा घेवून बोगस कामे केलेल्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. शेख यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्र लिहिले आहे.