नवी मुंबईतील एका बँकेत नुकताच दरोडा पडला. दरोडेखोरांच्या टोळीने बँकेच्या बाजूच्या गाळ्यातून भुयार खणून बँकेची लॉकररूम लुटली. आता एवढे मोठे भुयार खणले तरी त्याचा आजुबाजूला कोणाला पत्ता लागू नये हे आश्चर्यच. दरोडय़ाची ही घटना वाईटच. पण त्यातही दिसली ती चोरांची चलाखीच. सामान्य लोकांना आकर्षण असते ते चोरांच्या या चलाखीचे, कौशल्याचे. म्हणून तर चौर्यकथा (म्हणजे चोरांच्या, चोरलेल्या नव्हे!) मोठय़ा आवडीने वाचल्या जातात. इंग्लंडमधील ‘ग्रेट ट्रेन रॉबरी’ आजही लोकप्रिय असते.

चोरांच्या या चलाख्या मुंबईलाही नव्या नाहीत. येथे ‘इंग्रजांचा अंमल चालू झाल्यापासून दरोडे, पुंडावकी अशा चोऱ्या होणे हळूहळू बंद होत गेले’ असे ‘मुंबईचे वर्णन’कार माडगांवकर सांगतात. पण या पुस्तकात त्यांनी त्या काळातील, म्हणजे साधारणत १८३० पासूनच्या चोऱ्या, दरोडय़ांच्या कहाण्या अगदी चवीने वर्णिल्या आहेत. ते सांगतात, ‘पूर्वी लोक दिव्यांची वात पडली कीं, दरवाजे बंद करून जिकडे तिकडे चोरांच्या व तर्कटी लोकांच्या भयानें घरांत पडून रहात. रस्त्यांतून जात असतां संध्याकाळच्या कित्येकांच्या पागोटय़ा जात व कित्येकांच्या आंगावरचे दागिने काढून घेऊन हाणमार करून त्यांस लावून देत. मार्किटांत खिसेकात्रु व दुसरे लुच्चे लबाड लोक अनेक तऱ्हेचीं ढोंगें करून गरीब लोकांसच लुटून घेत इतकेंच नाही, परंतु मी मी ह्मणणारांची देखील केंव्हांच रेवडी करून टाकीत.’

हे वाचले की वाटते मुंबई बदलली असे म्हणतात, परंतु ते काही तेवढेसे खरे नाही. या मुंबईत तेव्हा –

‘कित्येक मेमण व खोजे लोकांची टोळी कांपाच्या मैदानाजळ, डोंगरीवर व खाटकी बाजाराजवळ एका तऱ्हेचा फितीची जुगार मांडून बसे. आणि ते त्या योदानें लोकांस नागवून घेत. कदाचित तो काही हुजत करायास लागला तर धकाबुकी करून त्यास मारून पळून जात.’ आज हा तपशील बदलला आहे, पण लुटमारीचा आशय तोच आहे.

माडगांवकरांनी या पुस्तकात एका टोळीचे वर्णन केले आहे. मोठी हुशार टोळी होती ती. ते सांगतात –

‘एक टोळी होती तिचा धंदा हाच होता कीं, लोकांच्या वखारींतून रात्रीचा माल लुटून न्यावा.’ म्हणजे दरोडेखोरच ते. त्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ – गुन्ह्य़ाची कार्यपद्धती – आजही काहीशी परिचित वाटते का ते पाहा. –

या टोळीची ‘अशी गोष्ट सांगतात कीं, तिच्या मुकादमाजवळ (चोरांच्या टोळीच्या सरदाराला माडगांवकर मुकादम म्हणतात ते मजेशीरच.) सुमारें दोनशें चारशें अनेक तऱ्हेच्या किल्ल्या होत्या आणि रात्र पडली ह्मणजे तो हाताच्या सगळ्या बोटांत तीस चाळीस सोन्याच्या अंगठय़ा घालीं आणि काहीं मंडळी बरोबर घेऊन चाव्यांचा घोस कंबरेस बांधून बाहेर पडे. मग ज्या वखारींत चांगला माल असेल तीस चावी लावून माल बाहेर काढी. तेव्हां कोणी अडथळा करूं लागला कीं त्याच्या हातांत एक दोन अंगठय़ा टाकून त्यास थंड करी आणि मग निर्धोकरणीं वखार खालीं करून टाकी.’

पुन्हा तेच. तपशील वेगळा, पण आशय तोच. आजच्या तर्कटी मंडळींकडे चाव्यांचा गुच्छ नसतो, त्यांच्याकडे ‘पासवर्ड’ किंवा ‘पीन नंबर’ असतात, त्यांनी ते मिळविलेले असतात आणि ते दरोडा टाकतात तो वखारींवर नव्हे, तर बँकांवर, एटीएमवर, तुमच्या आमच्या खात्यांवर. त्यांच्यापुढे ते भुयारी दरोडेखोर म्हणजे बच्चेच म्हणायचे.