मुंबई : मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा प्रसिद्ध करताना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे, असा आरोप युवा सेनेने केला आहे.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युवा सेनेने या संदर्भात निवेदन दिले आहे. तसेच याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केली जावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यापीठाचा पाच आणि एक वर्षांचा बृहत आराखडा विद्यापीठांकडून तयार केला जातो. या कायद्यानुसार बृहत आराखडा तयार करण्याची आणि सर्वेक्षण करण्याची जबाबदारी प्र- कुलगुरूंची आहे. त्यांनी सादर केलेल्या आराखडय़ाला महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विकास आयोगाला (माहेड) मान्यता देते. मात्र यावर्षी राज्यातील विद्यापीठांच्या प्राधिकरणांची मान्यता न घेताच विद्यापीठांवर ‘माहेड’कडून हा आराखडा लादण्यात आला, असा आरोप युवा सेनेने केला आहे.

याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांच्याकडे दाखल केली होती. मात्र त्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही, असाही आरोप युवा सेनेच्यावतीने करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.