अभ्यासाचा प्रचंड ताण आणि दहावीच्या परीक्षेची भीती यामुळे अमरावती जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांने घरातून पळ काढला आणि थेट मुंबई गाठली. परंतु कुलाबा पोलिसांच्या सतर्कतेने तो सुखरुप सापडला.
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा गावातील अंकुश त्यागी (१६) हा विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारपासून दहावीची परीक्षा सुरू होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड तणावाखाली होता. परीक्षेच्या भीतीमुळे अंकुशने २६ फेब्रुवारी रोजी घरातून पळ काढत आणि थेट मुंबई गाठली. अंकुश घरातून बेपत्ता झाल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. तो बेपत्ता असल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. गेट वे ऑफ  इंडिया येथील उद्यानाजवळ शुक्रवारी संध्याकाळी गस्तीवर असलेल्या कुलाबा पोलीस ठाण्यातील हवालदार पोलीस नाईक युवराज खैरनार याच्या नजरेस अंकुश पडला. तो दोन तास एकाच ठिकाणी बसून होता. त्यामुळे संशय आल्याने खैरनार यांनी त्याची चौकशी केली. मी माझ्या भावाची वाट पाहतोय असे त्याने खोटे सांगितले. मात्र अधिक चौकशीनंतर खरा प्रकार उघडकीस आला़