८ सप्टेंबरला सावरकर स्मारक सभागृहात कार्यक्रम
संघर्ष कुणाला चुकलेला नाही, परंतु त्यातून मार्ग काढत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे फार कमीच असतात. महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर ही त्यापैकी एक. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे नाव गाजवणाऱ्या ललिता बाबरशी मुक्त संवादाचा कार्यक्रम येत्या मंगळवारी दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात रंगणार आहे. निमित्त आहे लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या २७ व्या पर्वाचे.
वेगवेगळ्या क्षेत्रात धडाडीने काम करून स्वतचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांशी संवाद साधून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने लोकसत्ताने व्हिवा लाउंज हा उपक्रम सुरू केला. ललिताच्या रूपाने आंतरराष्ट्रीय धावपटू प्रेक्षकांना भेटणार आहे. केसरी प्रस्तुत आणि दिशा डायरेक्टच्या सहकार्याने होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्य़ातील माण तालुक्यातील मोही या खेडेगावात सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेल्या ललिताने पुरेशा सोयीसुविधा नसतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सहभाग घेत आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या ललिताने मुंबई मॅरेथॉन सलग तीन वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. २०१४मध्ये तिने प्रथमच ३००० मीटर स्टिपलचेस शर्यतीत सहभाग घेतला आणि तेथेही राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून महाराष्ट्राची मान उंचावली. आशियायी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
नुकत्याच झालेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत तिने स्टीपलचेसमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला आणि आपले ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. मैदानावर अडथळ्यांची शर्यत जिंकणाऱ्या ललिताने मैदानाबाहेरही अनेक अडथळे पार करत यश मिळवले आहे. तिचा प्रवास तिच्याच तोंडून जाणून घेण्याची संधी मंगळवारी मिळणार आहे.
’कधी – मंगळवार, ८ सप्टेंबर
’वेळ – संध्याकाळी ४.४५ वाजता
’कुठे – स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प.)
’प्रवेश – विनामूल्य (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर)
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2015 रोजी प्रकाशित
व्हिवा लाउंजमध्ये धावपटू ललिता बाबरशी गप्पा
ललिताने मुंबई मॅरेथॉन सलग तीन वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 05-09-2015 at 05:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Runner lalita babar in viva lounge