या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील नेत्यांच्या सरबराईसाठी उठाठेवी; तक्रारींनंतर उद्धव ठाकरेंकडून कानउघाडणी

पक्षबांधणी, बैठका, निवडणुकीचा प्रचार, जाहीर सभांच्या निमित्ताने विविध जिल्ह्य़ांमध्ये जाणाऱ्या शिवसेनेच्या ‘फुकट फौजदार’ नेत्यांची सरबराई करून ग्रामीण भागातील स्थानिक नेते जेरीस आले असून ग्रामीण नेते विरुद्ध मुंबईतील नेते असा नवा वाद शिवसेनेत निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील नेत्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख यांनी मुंबईमधील ‘फुकट फौजदार’ नेत्यांची खरडपट्टी काढत यापुढे दौऱ्यांचा खर्च स्वत: उचलण्याचे आदेश दिले. ग्रामीण भागातील नेत्यांवर आर्थिक भार टाकू नये अशी सक्त ताकीदच उद्धव ठाकरे यांनी नेते मंडळींना दिली आहे.

शिवसेना नेत्यांवर विविध जिल्ह्य़ांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या त्या जिल्ह्य़ांमध्ये पक्षबांधणी करणे, स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन करणे, निवडणुकांमध्ये प्रचार करणे, जाहीर सभा घेणे आदी कामांची जबाबदारी जिल्हावार नेमणुका करण्यात आलेल्या संबंधित नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील ही नेते मंडळी अधूनमधून आपल्यावर जबाबदारी असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये फेऱ्या मारत असतात. परंतु हे नेते केवळ हवा पालटण्यासाठी जिल्ह्य़ांच्या दौऱ्यावर येत असल्याची तक्रार काही स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

जिल्ह्य़ांचे पालकत्व असलेले नेते आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करावे लागते. जिल्ह्य़ातील बडय़ा हॉटेलमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करावी लागते, ग्रामीण भागात फिरण्यासाठी मोठी गाडी सज्ज ठेवावी लागते, त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा लवाजमा ठेवावा लागतो, त्यांच्या फर्माईशीनुसार सर्व व्यवस्था करणे भाग पडते, अशा तक्रारी अनेक जिल्ह्य़ांमधील स्थानिक नेत्यांनी प्रत्यक्षात ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. निवडणुकीच्या जाहीर सभेचे आयोजन केल्यानंतर किमान पाच हजारांचा जमाव जमविण्याचे फर्मान नेते मंडळी देत असून सभेसाठी जमाव गोळा करताना प्रचंड धावपळ करावी लागते. सभेसाठी येणाऱ्यांसाठी वाहनांची, चहा-नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. निवडणुकीचा खर्च परवडला, पण नेत्यांच्या सरबराईवरील खर्च परवडत नसल्याची व्यथा या मंडळींनी पक्षप्रमुखांपुढे मांडली.

विविध जिल्ह्य़ांचे पालकत्व दिलेल्या नेत्यांमध्ये मंत्री, खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ग्रामीण भागांची जबाबदारी या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. सरकारकडून मिळणारे भत्ते आणि अन्य फायद्यांचा वापर नेते मंडळींनी ग्रामीण भागात पक्षबांधणीसाठी करावा असे अपेक्षित आहे. परंतु नेते मंडळी ग्रामीण भागातील नेत्यांवर आर्थिक भार टाकत असल्याचे कळताच उद्धव ठाकरे प्रचंड संतापले. येत्या फेब्रुवारीमध्ये अनेक जिल्ह्य़ांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील नेत्यांची तातडीने बैठक बोलावून उद्धव ठाकरे यांनी त्यांना चांगलीच समज दिल्याचे समजते.

पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमधील शिवसेनेच्या विभागप्रमुखांना तंबी दिली होती. त्यापाठोपाठ ग्रामीण भागातील नेत्यांवर आर्थिक भार टाकणाऱ्या नेत्यांचीही त्यांनी हजेरी घेतली. नेमून दिलेल्या जिल्ह्य़ांतील दौऱ्यांवरील खर्च स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांवर टाकायचा नाही. स्वखर्चाने दौऱ्यावर जायचे. तसेच तेथील स्वत:चा निवास, भोजनाची व्यवस्थाही स्वत:च करायची, असा सज्जड दम उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांना बैठक दिल्याचे समजते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या दौऱ्यांविषयीचा अहवाल नियमितपणे सादर करावा. भविष्यात दौऱ्यांच्या खर्चाचा भार स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टाकण्यात आल्याची तक्रार आल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दमही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rural shiv sainiks distressed with mumbai leaders
First published on: 18-01-2017 at 02:29 IST