मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातही बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. त्याचाच भाग म्हणून वाझे यांनी गुरुवारी विशेष न्यायालयात त्याबाबत अर्ज केला. विशेष न्यायालयाने वाझे यांच्या अर्जाची दखल घेऊन त्यावर अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) २३ जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

देशमुखांविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने नुकतेच वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्याची परवानगी दिली होती. देशमुखांविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातही वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली असून त्याबाबत विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. वाझे यांनी या अर्जात, या प्रकरणाशी संबंधित सर्व तथ्ये त्यांना उघड करायची आहेत आणि तपास यंत्रणेला त्यांनी नेहमीच सहकार्य केल्याचा दावा केला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी वाझे यांच्या अर्जावर ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारी महिन्यातच वाझे यांनी या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याबाबत ईडीला पत्र लिहिले होते. मात्र ईडीने अद्यापपर्यंत त्यावर काहीही प्रतिसाद दिलेला नाही.

दरम्यान, या प्रकरणीही वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास परवानगी दिली गेली तर ते ईडीचे साक्षीदार असतील. तसेच त्यांनी दिलेल्या जबाबाचा देशमुख यांच्यासह अन्य आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी वापर केला जाईल. शिवाय या प्रकरणीही माफीचा साक्षीदार झाल्याने त्यांची शिक्षा माफ होईल.