भाजपाने शिवसेना फोडण्यासाठी ‘ऑपरेशन’ राबवलं, असं मोठं विधान भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. यानंतर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. “शिवसेना फुटावी ही शरद पवारांची इच्छा नव्हती, तर भाजपाची इच्छा होती,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते मंगळवारी (१० जानेवारी) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “हे लोक म्हणतात शरद पवारांमुळे शिवसेना फुटली, पण शिवसेना फुटावी हे पवाराचं स्वप्न नव्हतं, तर भाजपाचं जुनं स्वप्न होतं. आज गिरीश महाजन स्पष्ट बोलले. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या पोटातील सत्य ओठांवर आलं.”

“आमच्या खोकेबहाद्दर ४० आमदारांना भाजपाचा डाव कळाला नाही”

“भाजपाला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. त्याआड शिवसेना येऊ शकते म्हणून ते आधी शिवसेनेचे तुकडे करत आहेत. हेच भाजपाचे राष्ट्रीय धोरण आहे. हे आमच्या खोकेबहाद्दर ४० आमदारांना कळालं नाही. अशाप्रकारे ते महाराष्ट्राबरोबर बेईमानी करण्याच्या कटात सामील झाले आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

गिरीश महाजन काय म्हणाले होते?

गिरीश महाजन म्हणाले, “हे खरं आहे की, आम्ही शिवसेनेमधील ‘ऑपरेशनला’ सुरुवात केली होती, पण यात यश येईल यावर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र, एकनाथ शिंदे बाहेर निघाले आणि पुढे गेले. बघताबघता सर्व सैन्य त्यांच्यामागे गेलं. शेवटी जमलं. झालं एकदाचं.”

हेही वाचा : Photos : सरकार कोसळण्याच्या राऊतांच्या दाव्यापासून राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या आरोपापर्यंत, शरद पवारांची महत्त्वाची विधानं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“४० लोक उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडले”

“या सगळ्या गोष्टी जमून आल्या, घडून आल्या. शिवसेनेसारख्या पक्षातून ४० लोक उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडले. हे सोपं नव्हतं. शेवटी लोक आले आणि एकनाथ शिंदेंच्या मागे उभे राहिले. त्यामुळे त्यांच्यामागे अनेकांचे आशीर्वाद आहेत,” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.