अनिता अडवाणी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया यांना नोटीस पाठविली आहे. यापूर्वी, अनिता यांनी डिंपल कपाडिया, अक्षय आणि ट्विंकल यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार केल्याच्या आरोपावरून याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर अनिता यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने अक्षय आणि डिंपल यांना नोटीस पाठविली आहे.
२०१३ साली अडवाणी यांनी डिंपल, अक्षय कुमार, टि्वंकल आणि रिंकी अशा चौघांविरुद्ध घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या अन्य कुटुंबीयांनी आपल्याला घरातून हाकलून लावले. तसेच त्यांच्या अत्यंसंस्काराच्या वेळेसही धक्काबुक्की केल्याचा आरोप अडवाणी यांनी केला होता. शिवाय राजेश खन्ना यांच्या मालमत्तेवरील काही भागावर हक्क सांगत दर महिन्याला देखभाल खर्च आणि वांद्रे येथे तीन खोल्यांचे घर देण्याची मागणी केली होती. मात्र, अडवाणी या राजेश खन्ना यांच्यासोबत ‘लिव्ह इन पार्टनर’ म्हणून राहात होत्या. त्यामुळे त्या घरगुती हिंसाचाराचा खटला खन्ना कुटुंबीयांविरोधात दाखल करू शकत नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने अनिता यांची याचिका फेटाळून लावली होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने अक्षय आणि डिंपल यांना नोटीस पाठविल्यानंतर ‘न्याय होतोच आणि मी त्यासाठी वाट पाहायला तयार आहे,’ अशी प्रतिक्रिया अनिता यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc issues notices to dimple kapadia and akshay kumar on a plea of anita advani
First published on: 07-08-2015 at 03:23 IST