दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटल्याने आणि त्यामध्ये एक अल्पवयीन गुन्हेगार असल्याने बालगुन्हेगाराची वयोमर्यादा नेमकी किती असावी, याबाबतही मतभेद निर्माण झाले आहेत. सध्या १८ वर्षांखालील मुलास बालगुन्हेगार म्हणून संबोधले जात असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात २०११ मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दंगल माजविणे अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्य़ांप्रकरणी शेकडो मुलांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी ‘हेल्प मुंबई फाऊण्डेशन’ने (एचएमएफ) जाहीर केली आहे.
सरकारला बालगुन्हेगारीचे वय कायदेशीरपणे कमी करावयाचे नसल्यास त्यांच्यासमोर घटनादुरुस्तीचा पर्याय आहे. त्यानुसार १८ वर्षांखालील मुलावर खून, बलात्कार, सदोष मनुष्यवध, अपहरण, दरोडा, अमली पदार्थाची वाहतूक करणे असे गंभीर आरोप असतील, तर बालगुन्हेगार म्हणून त्याला त्याचा लाभ उठविता येऊ नये, असे एचएमएफने म्हटले आहे. भारताचे सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांच्या पत्नी आणि बालहक्क कार्यकर्त्यां मीना कबीर यांच्या मते अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांसाठी बालगुन्हेगारीची वयोमर्यादा कमी करणे हे असमर्थनीय आहे. मात्र मीना कबीर यांचे हे विधानच असमर्थनीय आणि महिलांवरील गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली असल्याच्या वास्तवापासून दूर जाणारे असल्याचे एचएमएफने म्हटले आहे.
भारतापेक्षा बालगुन्हेगारीचे जगातील चित्र जास्त वास्तववादी आहे. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमाचा वापर केल्याने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी हा पर्याय खुला झाला आहे; तथापि या प्रकरणातील एक आरोपी आणखी चार महिन्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण करणार आहे, हा चर्चेचा विषय झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याला बालगुन्हेगारी म्हणावे?
महाराष्ट्रात २०११ मध्ये खुनाच्या आरोपाखाली १८ वर्षांखालील १८९ मुलांना, खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली १७४, बलात्काराच्या आरोपाखाली १३६, दंगल माजविण्याच्या आरोपाखाली ६७०, जखमी करणे अथवा गंभीर जखमी करण्याच्या आरोपाखाली १२७०, विनयभंगप्रकरणी १२४ आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी ३३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच बालगुन्हेगाराची वयोमर्यादा १८ वरून १५ करणे उचित असल्याचे मत ‘एचएमएफ’ने वर्तविले आहे.

बालगुन्हेगारी जगभरात?
विविध देशांमधील बालगुन्हेगारीबाबतची तरतूद पाहता केवळ भारतातच १८ वर्षांखालील आरोपीला बालगुन्हेगार संबोधले जात असल्याचे निदर्शनास येते. अमेरिकेतील चार राज्यांमध्ये मुलगा अथवा मुलीने वयाची १७ वर्षे पूर्ण करण्यापूर्वी फौजदारी गुन्हा केला असल्यास त्याच्यावर पूर्वी बालगुन्हेगार म्हणून कारवाई केली जात असे. न्यूयॉर्क आणि उत्तर कॅरोलिनामध्ये वयोमर्यादा १६ आहे. इलिनोइस, मिशिगन, टेक्सास आणि अन्य आठ राज्यांमध्ये किमान वय १७ आहे, तर वॉशिंग्टनसह अन्य राज्यांमध्ये किमान वय हे गुन्हा किती गंभीर स्वरूपाचा आहे त्यावर अवलंबून आहे. ब्रिटनच्या कायद्यानुसार १७ वर्षांखालील मुलांना, स्कॉटलंडमध्ये १६ वर्षांखालील मुलांना बालगुन्हेगार म्हणून ग्राह्य़ धरले जाते, तर जपानमध्ये हे वयोमान १६ वरून १४ करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scale of child crime is dangourous in state
First published on: 06-01-2013 at 03:58 IST