माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अडचणींमध्ये वाढ
आदिवासी विकास विभागात आणि महामंडळात शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार २००४ ते २००९ या कालावधीत झाल्याचा ठपका माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठेवला असून त्याची जबाबदारी तत्कालीन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आणि मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याच्या आशेवर असलेल्या गावित यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी असलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयापुढे सुमारे तीन हजार पानी चौकशी अहवाल सादर झाला आहे.
आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने डॉ. गावित यांच्या कार्यकाळात अनेक योजना राबविण्यात आल्या. या खात्यात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाले आणि आदिवासींसाठी अनेक योजनांमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप करणारी याचिका बळीराम मोतीराम व गुलाब पाटील यांनी अॅड. राजेंद्र रघुवंशी यांच्यामार्फत केली असून गेली काही वर्षे त्यावर सुनावण्या झाल्या. चौकशीच्या मागणीनंतर माजी न्यायमूर्ती गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांनी तीन वर्षांच्या कालावधीत २००४ ते २००९ या काळातील गैरव्यवहारांची चौकशी केली. अर्जदारांनी २०१२ पर्यंतच्या अनेक खरेदी प्रकरणांच्या चौकशीची मागणी केली असून गावित यांच्याबरोबरच बबनराव पाचपुते, राजेंद्र गावित व शरद गावित यांच्यावरही आरोप होते. पण त्यांच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्याने आणि २००९ पर्यंतच चौकशी केल्याने समितीने त्यांच्यावर ठपका ठेवलेला नाही.
गैरव्यवहारांचे स्वरूप
- आदिवासींसाठी शेतामध्ये विहिरीवर डिझेल पंप पुरविणे, गॅस शेगडय़ा देणे, मुलांसाठी आश्रम शाळा व वसतिगृहांमध्ये चटई आणि अन्य साहित्य, द्रवरूप प्रोटीन आदी पुरविणे, आदिवासींना दुभती जनावरे पुरविणे, अशी अनेक कोटय़वधी रुपयांची खरेदी व कामे महामंडळामार्फत देण्यात आली. तेव्हा निविदा न मागविणे, दर करारानुसार कंत्राटे देणे, त्यात दर वाढविणे, लाभार्थी न तपासता खरेदी आणि लाभार्थ्यांपर्यंत वस्तूच न पोचणे, वस्तूंच्या बाजारपेठेतील दर, दर्जा यांची तपासणी न करणे आदी अनेक प्रकारातून हे गैरव्यवहार आठ वर्षांच्या कार्यकाळात झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
- अंगणवाडय़ा व आश्रमशाळांमध्ये द्रवरूप प्रोटीन आणि चटई पुरविण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप असल्याने समितीने त्याची चौकशी केली. ही योजना आदिवासी विभागाच्या निधीतून महिला व बालकल्याण विभागाकडून राबविली जात असल्याचे समितीला सांगण्यात आले. मूळ फाइल मागविली असता ती हरविल्याचे उत्तर आदिवासी विभागाने समितीपुढे दिले. काथ्या मित्र मंडळाकडून दर करारानुसार चटया खरेदी करण्यात आल्या, हे समितीला सांगण्यात आले. यासंदर्भात थेट गावित यांच्याकडेच पत्र देण्यात आल्याचा आरोप याचिकेत असून त्यांनी प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. पण याबाबतची फाइलच उपलब्ध नसल्याने अन्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेत गैरव्यवहार व ढवळाढवळ करण्याचा अधिकार आदिवासी विकास विभागाला अजिबातच नव्हता, असा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुरविण्यासाठी २००४-०८ या कालावधीत ७७५८ डिझेल इंजिन सेट १९ हजार २०० रुपये दराने खरेदी करण्यात आले. प्रत्यक्षात दरकरारानुसार हा दर १५ हजार रुपये होता. त्यातून १४ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात हे सेट शेतकऱ्यांपर्यंत पोचलेच नाहीत आणि त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
- गावित यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या महामंडळाच्या कारभाराची लक्तरे समितीने आपल्या चौकशी अहवालात सविस्तरपणे मांडली आहेत. आदिवासींसाठी एक लाख २४ हजार गॅस शेगडय़ा मीरा डेकोर कंत्राटदाराकडून घाईघाईने खरेदी करण्यात आल्या. त्यामुळे २५ हजार ५२७ शेगडय़ांचे वाटपच झाले नाही आणि त्या गंजून गेल्या. त्यातून सुमारे तीन कोटी ६५ लाख रुपयांचे सरकारचे नुकसान झाले. तर या शेगडय़ा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचल्याच नाहीत आणि सरकारला सुमारे सात कोटी ३२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचाही ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.
- समितीने अशा अनेक खरेदी व्यवहारांची छाननी करून शासकीय योजनांचे करोडो रुपये हडपल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये आलेल्या गावित यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहारांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे प्रकरण न्यायालयात असल्याने कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. तसेच २००८ ते १२ या कालावधीतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठीही पावले टाकावी लागणार आहेत.
- यासंदर्भात डॉ. गावित यांच्या नंदुरबार येथील निवासस्थानी संपर्क साधला असता ते बाहेरगावी असून उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले.

