विविध कार्यक्रमांचे आयोजन
राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्ये आज, २६ नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीनेही संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्य घटना अंगिकृत व अधिनियमित करून स्वतप्रत अर्पण करण्यात आली. तो दिवस संविधान दिन म्हणून मानण्यात येतो. संविधनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी राज्यात २००८ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. यंदा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय-निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, शाळा व महाविद्यालयांमध्ये संविधनाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे.
संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा-महाविद्यालयांमार्फत संविधान यात्रा काढण्यात येणार आहे. त्यात संविधानाची प्रास्ताविका, मूलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या इत्यादी संविधानातील महत्त्वाची कलमे ठळकपणे दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरावीत, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. या निमित्त भितिपत्रके, निबंध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था यांच्या वतीने प्रचार फेऱ्या, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School college political party do to celebrate samvidhan diwas today
First published on: 26-11-2015 at 05:22 IST