एका शाळकरी मुलीला फूस लावून जिवदानी दर्शनासाठी घेऊन जातो असे सांगून पालघर व डहाणू येथे नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या राजेंद्र ऊर्फ बसंत रामभवन सरोज (१८) यास भाईंदर पोलिसांनी अटक केली. आज ठाणे न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
भाईंदर (प.) येथील गणेश देवल नगर येथेच १४ वर्षांची पिडीत मुलगी राहात होती. तिचे व राजेंद्र यांचे मोबाईलवर बोलणे होत असे. ४ मार्च रोजी शालेय गणवेशात त्याने त्या मुलीला ‘जिवदानी दर्शनास जाऊ’ असे सांगून बोईसर व पालघर येथे नेले व तेथेच बलात्कार केला असावा असे सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप पुन्नरवाल यांनी सांगितले. मुलगी हरविल्याची तक्रार तिच्या पालकांनी भाईंदर पोलीस स्थानकात केली होती. मोबाईल क्रमांकांच्या तपासातून पोलिसांनी राजेंद्र याचा शोध घेऊन त्याला अटक केली.