मुंबई : अणूउर्जेबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी, त्याचे पर्यावरणाच्यादृष्टीने असणारे फायदे यांबाबत जागृती करण्यासाठी अणूऊर्जेवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनीच सायकल फेरी काढली. दिल्ली येथील इंडिया गेटपासून सुरू झालेल्या प्रवासाची मंगळवारी मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे सांगता झाली.

भाभा अणुसंशोधन केंद्रातील (बीएआरसी) वरिष्ठ शास्त्रज्ञांनी अणुऊर्जेला चालना देण्यासाठी दिल्लीतील इंडिया गेटपासून १३ ऑगस्टपासून सुरू झालेले सायक्लोथॉन मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पूर्ण झाले. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांतून १७०० किमीचा प्रवास शास्त्रज्ञांनी केला.

चंदन डे, सुशील तिवारी, विमल कुमार, जातपाल सिंग, डॉ. राजेश कुमार, विनयकुमार मिश्रा, नितीन कवाडे हे संशोधक या सायकल फेरीत सहभागी झाले होते. अणुभट्टय़ा या पर्यावरणदृष्टय़ा सुरक्षित आहेत. पर्यावरणाबाबत उभ्या ठाकलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सायकल आणि अणूऊर्जेचा वापर दोन्ही अपरिहार्य पर्याय आहेत, असे सहभागी अणूशास्त्रज्ञांनी सांगितले. अणऊर्जा विभागाचे सचिव के. एन. व्यास, संचालक ए. के. मोहंती, बी. के. जैन यांनी त्यांचे अभिनंदन केले.