|| प्रसाद रावकर

मुंबई : दादर चौपाटीवर समुद्री पदपथाचे काम वेळेत सुरू न झाल्याने या प्रकल्पाचा निधी करोनाविषयक कामांसाठी वळविण्यात आला आहे. आता निधी उपलब्धतेनंतरच हे काम सुरू होऊ शकेल.

माहीम, दादर, वरळीदरम्यान समुद्रकिनाऱ्यालगत विविध सुविधांनी युक्त असा ३.५ किलोमीटर लांबीचा आकर्षक समुद्री पदपथ उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पांडुरंग नाईक मार्गाकडून थेट ज्ञानेश्वार उद्यानापर्यंत समुद्री पदपथ उभारण्याचे प्रस्तावित आहे. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे स्मारक, स्वा. सावरकर स्मारकाच्या पाठीमागे समुद्रकिनाऱ्यालगत हा पदपथ उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक पर्यावरण, पालिका तसेच सीआरझेडची परवानगी मिळाली आहे.  पदपथावरील क्लबजवळ योगासने करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिल्या टप्प्यातील कामासाठी १४ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. निधी उपलब्ध होताच कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार होती. मात्र करोना संसर्गामुळे निर्माण परिस्थिती लक्षात घेत कामे सुरू न झालेल्या प्रकल्पांचा निधी रोखण्यात आला. त्यात पदपथाच्या निधीचाही समावेश होता. या प्रकल्पाचे काम फेब्रुवारी-मार्च दरम्यान सुरू होणार होते. परंतु निधी रोखल्याने हे काम सुरू होऊ शकले नाही. आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध होईपर्यंत या प्रकल्पाचा श्रीगणेशा करता येणार नाही.

‘सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच निधी उपलब्ध करण्यात येईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होईल. सहा महिन्यांत ते पूर्ण करण्यात येईल,’ या प्रकल्पाचे वास्तुविशारद शशांक मेहेंदळे यांनी सांगितले.