एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्यानंतर आता सर्व विभाग पुन्हा कामाला लागले आहेत. गेल्या २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील तब्बल २५ हजारांहून अधिक लोक शोधून काढले आहेत. त्यापैकी १२ हजारांहून अधिक लोक हे अतिजोखमीच्या गटातील आहेत.

मुंबईतील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी गेल्या आठवडय़ात सर्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या वेळी मुंबईतील अतिजोखमीचे संपर्क शोधण्याची मोहीम मंदावली असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईत सुरुवातीच्या काळात संसर्ग वाढला तेव्हा झोपडपट्टय़ांमध्ये ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबवून ज्या पद्धतीने रुग्णांच्या जवळचे संपर्क शोधले गेले तशाच आक्रमक पद्धतीने इमारतींमध्येही अतिजोखमीचे संपर्क शोधा, असे निर्देश आयुक्तांनी दिले होते. झोपडपट्टीत जसे एका रुग्णामागे १५ संपर्क असे प्रमाण ठेवण्यात आले होते तसेच प्रमाण इमारतीतील एका रुग्णामागेही ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे २४ तासांत तब्बल २५ हजार लोकांना शोधण्यात आले आहे.

एखाद्या इमारतीमध्ये कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती रुग्ण म्हणून सापडली तरी तिचे निकट संपर्क शोधण्यात अजिबात कसूर करू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ती व्यक्ती गेल्या सात-आठ दिवसांत  कोणाच्या संपर्कात आली होती याची सर्व माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चोवीस तासांत २५ हजारांहून अधिक निकट संपर्क शोधण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ टक्के  अतिजोखमीच्या, तर ५२ टक्के  कमी जोखमीच्या गटातील आहेत.

११ सप्टेंबरची शोधमोहीम 

* रुग्णांच्या संपर्कातील एकूण लोक : २५,०५६

* अति जोखमीच्या गटातील लोक : १२,१४२

*  कमी जोखमीच्या गटातील लोक : १२,९१४