कळवा भागातील मफतलाल कंपनीच्या मोकळ्या जागेमध्ये संरक्षक भिंत घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले असून येत्या शुक्रवारपासून महापालिका या कामाला सुरूवात करणार आहे. तसेच या निर्णयामुळे कामगारांची थकीत देणी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, अशी माहिती बम्बई मजदूर युनियनचे महासचिव संजय वढावकर यांनी दिली.
गेल्या २५ वर्षांपासून बंद असलेल्या मफतलाल कंपनीचे कामगार थकीत देणीच्या प्रतीक्षेत आहेत. या कंपनीच्या जागेवर अतिक्रमण झाले असून काही जागा मोकळी आहे. मध्यंतरी या कंपनीच्या जागेवर संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र हि भिंत टाकण्यासाठी अनधिकृत झोपडय़ा हटविण्याच्या कारवाईस स्थानिक नेत्यांसह नागरिकांनी कडाडून विरोध केला होता. दरम्यान, उच्च न्यायालयाने आता पुन्हा कंपनीच्या मोकळ्या जागेवर संरक्षक भिंत घालण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यानुसार, येत्या शुक्रवारपासून महापालिका या कामास सुरुवात करणार आहे. येत्या पाच महिन्यात हे काम पुर्ण करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तसेच हे काम पुर्ण झाल्यानंतर २००७ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वढावकर यांनी दिली. दोनशे कोटींचा कामगारांचा मुळ क्लेम मिळविण्याचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच १६० एकर जमिनीमध्ये १२६ एकर जमीन कंपनीची असून उर्वरित कंपनीच्या ७१ एकर जमिनीबाबत युनियनने न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे कामगारांच्या घरांचा प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठविल आहे, असे त्यांनी सांगितले.