पाच पदांसाठी चारच उमेदवारांची मुलाखत

जे जे कला महाविद्यालयाच्या वस्त्रकला विभागातील अधिव्याख्यातापदाची निवडप्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली असून पाच पदांसाठी जाहिरात असता ना मुलाखतीसाठी चौघेच उमेदवार पात्र ठरले आणि त्यांची निवड झाली आहे. या निवडप्रक्रियेत काही जणांना जाणीवपूर्वक निवडण्यासाठी निकष ठरविले गेले, छाननी चुकीची झाली आणि घाईघाईने अन्य बाबी झाल्याने या निवडीला स्थगिती देऊन नव्याने पारदर्शीपणे प्रक्रिया राबविण्याची मागणी काही उमेदवार आणि हंगामी अधिव्याख्यात्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे नुकतीच लेखी तक्रार देऊन केली आहे.

अधिव्याख्यात्यांच्या पाच जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडप्रक्रिया राबविली गेली. या पदांसाठी केवळ १५ अर्ज आले. त्यातील सात अर्ज बाद ठरविण्यात आले. उर्वरित आठपैकी दोन उमेदवारांना मुलाखतीचे पत्र पोचले नाही आणि सहापैकी दोघांना मुलाखतीच्या वेळी अपात्र ठरविले गेले. ऑनलाइन प्रक्रियेत पात्र ठरवून अर्ज स्वीकारल्यावर कागदपत्रांची योग्य छाननी न करताच काही उमेदवारांना अपात्र ठरविले गेले.

प्रत्यक्ष उद्योगात काम आणि व्याख्याता म्हणून अनुभव याबाबतचे निकष चुकीचे आहेत. त्यामुळे पाच जागांसाठी चारच उमेदवारांची मुलाखत झाली आणि त्यांची निवड झाली, अशी अपात्र ठरविलेल्या उमेदवारांनी तावडे व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. जागांसाठी पुरेसे उमेदवार नसतील तर नव्याने जाहिरात देऊन निवडप्रक्रिया राबविणे आवश्यक होते. मात्र काहींना झुकते माप देण्यासाठी घाईघाईने ही प्रक्रिया राबविली गेल्याचा आरोप काही उमेदवारांनी तक्रारीत केला आहे.

मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निवडप्रक्रियेत होतो, तज्ज्ञ व आयोगाचे प्रतिनिधीही त्यात होते, असे ते म्हणाले. वस्त्रोद्योग क्षेत्रात अन्य ठिकाणी महाविद्यालये कमी आहेत. निव्वळ उद्योगातील अनुभवाचा विचार केल्यास उमेदवार अधिक मिळू शकतात. जुन्या अटींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, मात्र त्यास अवधी लागणार आहे. पण ही प्रक्रिया नियमानुसार पार पडली असल्याचे जे जे कला महाविदय़ालयाचे अधिष्ठाते विश्वनाथ साबळे यांनी स्पष्ट केले.

निवडप्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत नियमानुसार राबविली गेली असून अधिव्याख्यात्यांसाठी तीन वर्षांचा प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा आणि शिकविण्याचा एकत्रित किंवा शिकविण्याचा अनुभव अशी अट आहे. यासह अन्य अटी गेली अनेक वर्षे असून त्यानुसारच ही प्रक्रिया झाली.  विश्वनाथ साबळे, अधिष्ठाता, जे जे कला महाविद्यालय