माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे निधन

गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जाणारे, सलग २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा (७७) यांचे सोमवारी पहाटे दीर्घकालीन आजाराने निवासस्थानी निधन झाले.

गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जाणारे, सलग २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा (७७) यांचे सोमवारी पहाटे दीर्घकालीन आजाराने निवासस्थानी निधन झाले.  मुंबईचे महापौरपद यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदे भूषविलेले खासदार देवरा हे गेले काही दिवस आजारी होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात होते. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा, मिलिंद आणि मुकुल हे पुत्र, सून असा परिवार आहे. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका आणि त्यांचे पती रॉबर्ट वढेरा, अहमद पटेल, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री प्रकाश मेहता, मनुष्यबळ विकासमंत्री विनोद तावडे, ‘रिलायन्स’ उद्योग समूहाचे मुकेश अंबानी, अनिल अंबानी, एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख, खासदार पूनम महाजन आदींनी देवरा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यूपीए सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच कंपनी व्यवहार या खात्यांचे मंत्रिपद देवरा यांनी भूषविले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवरा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

फोटो गॅलरी: मुरली देवरा यांचे निधन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Senior congress leader murli deora passes away after prolonged illness