पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर पालिकेचा निर्णय; पवई तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी पर्यायांचा विचार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पवई तलावात पालिकेमार्फत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिन्यांवर छोटे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसवण्याचा मुद्दा पालिकेने अखेर गुंडाळला आहे. हे प्रकल्प बसवण्याचा खर्च करण्याऐवजी तलावात सांडपाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांनी केली होती. या मागण्यांना ‘लोकसत्ता मुंबई’ने नियमित प्रसिद्धी दिली होती. अखेर पालिकेने हा निर्णय मागे घेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुसरे उपाय योजणार असल्याचे ‘पॉज’ या पर्यावरणवादी संघटनेला पत्राद्वारे कळवले आहे.

[jwplayer zVOMyVTv]

पवई तलावात पालिकेच्या जवळपास १२ मैला वाहिन्यांमार्फत सांडपाणी सोडण्यात येते. गेल्या काही वर्षांत तलावात मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण झाल्याने त्यातील जैवविविधता धोक्यात आली होती. तसेच मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या मगरींच्या जीवितालाही धोका उत्पन्न झाला होता. म्हणून या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते तलावात सोडण्यासाठी मैला वाहिन्यांच्या मुखाशी छोटे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसवण्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या मनात होते. मात्र, तलाव ही सांडपाणी सोडण्याची जागा नसल्याने तेथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसवणे चुकीचे आहे. त्यामुळे असले प्रकल्प बसवण्यात येऊ नयेत, अशी मागणी ‘पॉज’ या पर्यावरणवादी संस्थेचे सचिव सुनिश कुंजू यांनी केली होती. ‘लोकसत्ता मुंबई’तूनही या समस्येला वाचा फोडण्यात आली होती. या पाठपुराव्याची दखल घेत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हा सांडपाणी प्रकल्प गुंडाळला आहे.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाऐवजी या ठिकाणी अन्य काय उपाययोजना करता येतील, याची यादी पालिकेने ‘पॉज’ या संस्थेला कळवली आहे. यात तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी उपाय शोधण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच तलावाभोवती पर्यटनाला चालना मिळावी यासाठी मगरविहार, छोटेखानी पक्षी व फुलपाखरू संवर्धन केंद्र, हरित उद्यान, सुरक्षेसाठी सीसी टीव्ही, चालण्यासाठी उत्तम पदपथ व चांगले पथदिवे, त्याचबरोबरीने ‘म्युझिक लेझर शो’ आदी विकासकामांचा पालिकेने विकासकामाला सादर केलेल्या यादीत समावेश आहे. यासाठी ‘फ्रिश्चमन प्रभू’ या सल्लागार कंपनीला विकास आराखडा तयार करण्यास सांगितले असून याचा सविस्तर विकास आराखडा आल्यावर या कामांस सुरुवात होईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

नागरिकांची दिशाभूल

गेल्या काही दिवसांपासून आम्ही या गोष्टीसाठी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्याला यश आले असले तरी पालिकेने ही कामे तात्काळ केली पाहिजेत. पवई तलाव सुशोभीकरण व लेझर शो यातून पालिका जनतेची गेले अनेक दिवस भलामण करत असून त्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे,’’ असा आरोप एका लोकप्रतिनिधीने केला.

[jwplayer PuSvtqP8]

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sewage disposal project in powai cancelled
First published on: 23-11-2016 at 01:54 IST