पोलीस तपासातील धक्कादायक माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉर्डन मंजुळा गोविंद शेटय़े हिच्या हत्येपूर्वी तिच्यावर कारागृहातील सहा महिला अधिकाऱ्यांनीच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती नागपाडा पोलिसांसमोर आली आहे. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणासारखाच भयंकर आणि क्रूर प्रकार मंजुळाच्या बाबतीत महिला अधिकाऱ्यांकडून घडला आहे.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार हत्येपूर्वी दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून मंजुळाला दोन टप्प्यांत मारहाण करण्यात आली. बॅरेक नंबर ५ मध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण घडलीच पण तिचा लैंगिक छळही करण्यात आला. बॅरेकमध्ये ठेवण्यात आलेल्या अन्य महिला कैद्यांनी मंजुळाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘जीव हवा असेल तर बाजूला व्हा, नाही तर तुमचीही मंजुळा करू’ अशी धमकी त्यांना देण्यात आली. त्यामुळे मंजुळाचा छळ पाहण्याशिवाय या महिला कैद्यांकडे काहीही पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी मंजुळाचा मृत्यू झाल्याची वार्ता कारागृहात पसरली.

या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलते केले तेव्हा मंजुळावर घडलेल्या क्रूर शारीरिक, लैंगिक अत्याचाराला वाचा फुटली. हिंमत करून माहिती देण्यास पुढे आलेल्या एका महिला कैद्याच्या तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

तीनमहिन्यांपूर्वी मंजुळा येरवडा कारागृहातून भायखळा कारागृहात आली. तिला वॉर्डन किंवा जेलरची मदतनीस म्हणून नियुक्त करण्यात आले. बॅरेक नंबर ५ मधील सुमारे ५१ महिला कैद्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तिच्यावर होती. २३ जून रोजी सकाळचे जेवण वाढताना दोन अंडी आणि पाच पाव कमी पडले. अंडी व पावांचा हिशेब लागत नसल्याने जेलर पोखरकर यांनी मंजुळाला शिविगाळ केली. सकाळी अकराच्या सुमारास मुलाखतीसाठी म्हणून तिला बॅरेकमधून बाहेर काढून कारागृहाच्या कार्यालयात नेण्यात आले व तिथे तिला बेदम मारहाण करण्यात आली. मंजुळाच्या किंकाळ्या बॅरेकमध्ये बंद असलेल्या अन्य महिला कैद्यांना ऐकू जात होत्या. काही वेळाने मंजुळाने नेसलेल्या साडीचा फास तिच्या गळ्यात अडकवून आरोपी बिंदू, वसीमा, शीतल, आरती, सुरेखा यांनी तिला फरफटत बॅरेकपर्यंत आणले.

तासाभराने आरोपी जेलर पोखरकर आणि पाच महिला गार्ड पुन्हा बॅरेकमध्ये आल्या. या वेळी सहा जणींनी मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. बिंदू व सुरेखाच्या मदतीने वसीमाने मंजुळावर लैंगिक छळ केला. मंजुळाची अवस्था पाहावत नसल्याने अन्य महिला कैद्यांनी तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेलरसह सहा जणींनी त्यांना धमकावले. या अत्याचारानंतर मंजुळा संध्याकाळी सात वाजेपर्यंत बॅरेकमध्येच पडून होती. सातच्या सुमारास ती शुद्धीवर आली. स्वच्छतागृहात जाण्यासाठी अन्य महिला कैद्यांकडे तिने मदत मागितली. बराच वेळ झाला तरी ती स्वच्छतागृहातून बाहेर न आल्याने कारागृहातील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. बऱ्याच वेळाने भायखळा कारागृहातील डॉ. खान बॅरेकमध्ये आले आणि त्यांनी मंजुळाला जे. जे. रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले, असल्याची माहिती हाती आली आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस मंजुळाच्या बॅरेकमधील अन्य कैद्यांचे जबाब नोंदवीत आहेत. तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. नागपाडा पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत, असे एका अधिकाऱ्याने  सांगितले. शवविच्छेदनानंतर पुढील चाचण्यांसाठी मंजुळाचा व्हिसेरा जे. जे. रुग्णालयात जपून ठेवण्यात आला आहे. मंजुळाला मारहाण घडली तेथे ‘सीसीटीव्ही’ नसल्याने अन्य ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण पुरविण्याबाबत पोलिसांनी कारागृहाकडे पत्रव्यवहार केला आहे.

साक्षीदारांना अन्य कारागृहात हलवा!

  • शेटय़े कुटुंबीयांची मागणी

मंजुळा शेटय़े हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या भायखळा कारागृहातील अन्य महिला कैदी असून त्या भायखळा कारागृहातच आहेत. या प्रकरणाचा तपास नागपाडा पोलिसांकडून सुरू असला तरी साक्षीदार महिला कैद्यांवर कारागृहात दबाव येऊ शकतो. भीती किंवा आमिष दाखवून किंवा छळ करून त्यांना विसंगत माहिती देण्यास भाग पाडले जाऊ शकते, अशी भीती शेटय़े कुटुंबाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मंजुळा हत्याकांडातील साक्षीदार महिला कैद्यांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवावे, अशी मागणीही शेटय़े कुटुंबीयांनी केली आहे.

मंजुळाचे भाऊ अनंत शेटय़े ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, नागपाडा पोलिसांकडून मंजुळाच्या हत्येचा पारदर्शी तपास अपेक्षित आहे. त्यांचा तपास ज्या महिला कैद्यांच्या जबाबावर अवलंबून आहे त्या कारागृहातच आहेत. सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी कारागृहातील अन्य अधिकारी, कर्मचारी त्या महिला कैद्यांवर दबाव आणू शकतात. साक्षीदारांना अन्य कारागृहात हलविल्यास त्यांच्यावर दबाव येणार नाही आणि मंजुळाची हत्या का व कशी घडली याची नेमकी माहिती पोलिसांसमोर येऊ शकेल.

इंद्राणीचे आगीत तेल

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीने वॉर्डन मंजुळा शेटय़ेच्या मृत्यूनंतर भायखळा कारागृहातील अन्य कैदी महिलांना भडकावले. तिनेच सर्वप्रथम जाळपोळ सुरू केली, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’कडे केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual abuse case in byculla jail
First published on: 27-06-2017 at 04:36 IST