विनादरवाजाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूरला जाण्याचा योग आला नाही, पण मनाचे दरवाजे आतिथ्यशीलतेने सताड उघडलेल्या फुलारे-नाईक परिवाराच्या वाघोली शनिमंदिराला भेट देता आली. हे ठिकाण आपल्या अगदी आवाक्यातील तर आहेच, पण नव्या-जुन्याचा जाणीवपूर्वक संगम करून उभारलेले आहे. सुंदरतेचा आणि आपलेपणाचा प्रसन्न अनुभव घ्यायचा असेल तर इथे यायलाच हवे.

मुंबईपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर कोकणात किंवा गोव्याला गेल्याची अनुभूती देणारा वसई-विरार पट्टा आहे. निळ्या आभाळाशी गुजगोष्टी करणाऱ्या हिरव्यागार नारळी-पोफळीच्या झाडांमधून वळसे घेत जाणारा रस्ता, ठायी ठायी पाण्याने भरलेली ‘बावखलं’ म्हणजे पाऊसतळी दिसतात. एका चिमुकल्या गल्लीत आत वळल्यावर घरांच्या अंगणांतून गेलेला रस्ता एक वळण घेतो आणि भरपूर जागा असलेला वाहनतळ येतो.

सुमारे १२ एकर एवढय़ा विस्तीर्ण जागेत विविध प्रकल्प आहेत. ही जागा शेतीवाडीची असल्याने मुळातच हिरवीगार आहे. भातशेती, हंगामी पालेभाज्या, फळांनी लगडलेली झाडे, काही भागांत उंच गवत तर कुठे पाण्यावर तरंगणारी कमळे.. या सर्व हिरवाई आणि पाणथळ जागांमुळे विविध पक्षी इथे नांदतात. शनिदेव हा सूर्यपुत्र. या पारंपरिक मान्यतेला आधुनिक काव्यात्म न्याय देत पूर्ण जागेत सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, सोलर कुकर, सोलर हीटर यांचा वापर केला आहे.

आकाशाच्या निळ्या छत्राखाली एका उघडय़ा रिंगणाच्या मधोमध शिंगणापूरसारखी स्वयंभू शनीच्या शिळेची प्रतिकृती आहे. भाविक तिथे स्वहस्ते तेलाचा अभिषेक करू शकतात. तेलविक्री बचत गटाच्या महिलांमार्फत केलेली आहे. अभिषेकासाठी वापरले गेलेले हे तेल वाया न घालवता व्यवस्थित पुनर्वापर करून, त्यात औषधी वनस्पतींचे अर्क मिसळून वृद्धांना व रुग्णांना मालिशसाठी विनामूल्य प्रसादरूपाने वाटले जाते. शनिदेवाची प्रतिमा असलेले मंदिर प्रशस्त आणि आकर्षक आहे. उत्तम लाकूडकाम- कौले यांची फार सुरेख रचना बांधकामासाठी केलेली आहे. इथेसुद्धा भाविक आणि देव यांच्यामध्ये कोणी मध्यस्थ नाही. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना लक्ष वेधून घेतात विचारांना चांगली दिशा देणारे फलक! माणुसकीची मूल्ये वाचणाऱ्याच्या मनात पेरणारे, प्रसंगी डोळ्यात अंजन घालून जागे करणारे! प्रसाद म्हणून मिठाई तर मिळतेच, पण एक रोपही मिळते आणि हे एक तरी झाड लावण्याचा आणि ते जगवण्याचा विचार मनात रुजतो. हव्या असल्यास बियासुद्धा विनामूल्य मिळतात.

‘आधी पोटोबा आणि मग विठोबा’ ही म्हण लक्षात घेऊन महिला बचत गटातर्फे अस्सल मराठमोळे पदार्थ जसे की झुणकाभाकरी, थालीपीठ, बटाटेवडे उपलब्ध आहेत. बच्चेकंपनीची आवड लक्षात घेऊन मोजकेच पण रुचकर चायनीज पदार्थही मिळतात. लज्जतदार सुक्या चटण्यांपासून ते खमंग खोबऱ्याच्या वडय़ापर्यंत इथे बरेच काही विक्रीला उपलब्ध आहे. सामाजिक समारंभांसाठी एक प्रशस्त सभागृहही बांधलेले आहे. आयुष्यभर कष्ट करून थकलेल्या वृद्धांच्या दुखऱ्या पायांना घडीभर आराम देणारी, पाय दाबून देणारी यंत्रे विनामूल्य उपलब्ध केलेली आहेत.

आपल्या प्रेमळ मातेची स्मृती जपण्यासाठी इथे एक अतिशय सुंदर मनिबाईभवन उभारले आहे. अनोख्या वास्तुसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून गेलेच पाहिजे. जांभ्या दगडाच्या लाल चिऱ्यांचा वापर करून उभारलेल्या या एकमजली घराची बांधणी पाहताक्षणी प्रेमात पाडणारी आहे. या घरातली प्रत्येक वस्तू अगदी चोखंदळपणे निवडलेली आणि कलात्मकरीत्या मांडलेली आहे. जुन्या काळचे वैशिष्टय़पूर्ण आणि आरामदायक फर्निचर या वास्तूला फार शोभा देते. प्रकाशयोजनेसाठी इथे अप्रतिम असा काचेच्या शमादानांचा संग्रह आहे.

इथे आवर्जून भेट द्यायला अजून एक मोहक निमित्त म्हणजे दर शनिवारी सायंकाळी केला जाणारा दीपोत्सव. अंधार दाटत जाता जाता मंदिराच्या परिसरात केलेली तेलाच्या दिव्यांची रोषणाई बघणे एक नयनरम्य सोहळा असतो.

कसे जाल?

नालासोपारा स्थानकाच्या पश्चिमेकडून निर्मळला जाणाऱ्या नियमित बस आहेत. वाघोली स्टॉपवर उतरावे. शेअर रिक्षासुद्धा मिळतात. वसई व नालासोपारा यांच्या मध्यावर हे ठिकाण आहे.