या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षातील नेतेमंडळींना शरद पवार यांचा सूचक इशारा

छगन भुजबळ यांच्या अटकेने पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, या राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विधानावरून पक्षाने भुजबळांना वाऱ्यावर सोडल्याचे मानले जाते. पवारांच्या भूमिकेमुळे पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रतिक्रिया उमटली असून, अडचणीच्या काळात पक्ष ठामपणे मागे उभा राहणार नाही, असा संदेश नेतृत्वाने दिल्याची भावना झाली आहे.

भुजबळांची अटक हा सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप पवार यांनी केला. नंतर मात्र त्यांनी भुजबळांच्या अटकेने पक्षावर परिणाम होणार नाही, अशी भूमिका मांडली. भुजबळ यांच्या अटकेने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला होता. भुजबळांच्या अटकेने राष्ट्रवादीची नाचक्की झाली. या पाश्र्वभूमीवर पवारांनी मांडलेल्या भूमिकेवरून पक्ष भुजबळांच्या मागे ठामपणे उभा राहणार नाही, असा अर्थ काढला जातो. भुजबळांबद्दल फार काही सहानुभूती न दाखविल्यास पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होणार नाही, असा नेतृत्वाचा प्रयत्न असू शकतो. कारण भुजबळांची बाजू उचलून धरल्यास गैरव्यवहारांना राष्ट्रवादीची साथ आहे हा संदेश जाऊ शकतो. आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला नेतेमंडळींच्या गैरव्यवहारांचा फटका बसू नये हा प्रयत्न आहे.

भुजबळांबद्दल पवारांच्या भूमिकेने राष्ट्रवादीत मात्र काहीशी वेगळी प्रतिक्रिया उमटली आहे. अडचणीच्या काळात पक्ष किंवा नेतत्व पाठीशी राहणार नाही हा संदेश त्यातून गेला आहे. भुजबळांसारख्या पहिल्या फळीतील नेत्याची ही अवस्था असल्यास अन्य नेत्यांबद्दल काय, असा सवाल एका नेत्याने केला.

समर्थकांमध्ये अस्वस्थता

भुजबळांच्या अटकेपासूनच भुजबळ समर्थकांमध्ये वेगळी भावना आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे पंतप्रधान किंवा वित्तमंत्र्यांशी एवढे सलोख्याचे संबंध असताना ही अटक टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया भुजबळ समर्थकांनी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीच्या राजकारणात भुजबळ नेहमीच वादग्रस्त ठरले. पक्षातील अन्य नेत्यांची अनेकदा त्यांनी नाराजी ओढवून घेतली होती.

विदर्भ-मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र वादाला राष्ट्रवादीची फोडणी

गेल्या निवडणुकीत ग्रामीण भागात पक्षाचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार हे भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. १६ तारखेला राष्ट्रवादीच्या वतीने औरंगाबादमध्ये शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. फक्त विदर्भ आणि मराठवाडय़ाला सरकार झुकते माप देते, असा आरोप करीत शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्र या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात पक्षाला पुन्हा एकदा ताकद देण्यावर भर दिला आहे.

शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार या पवार कुटुंबियांचा दुष्काळी दौरा पार पडला. राष्ट्रवादीने आता कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. यासाठीच १६ मे रोजी पक्षाच्या वतीने औरंगाबादमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले असून, शरद पवार यांच्यासह सारे नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रात यश मिळाले. विधानसभेच्या ५८ जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आपले वर्चस्व कायम राखण्याकरिता राष्ट्रवादीने  खेळी सुरू केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on bhujbal case
First published on: 10-05-2016 at 03:19 IST