कोल्हापूर, ठाणे जिल्ह्य़ातील गटबाजी यापूर्वी हाताबाहेर गेल्याने कोकणात प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यातील वाद वेळीच आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मंगळवारी पुढाकार घ्यावा लागला. उभयतांना जबाबदारीची जाणीव करून देतानाच झाले तेवढे पुरे, असा सज्जड दमच पवार यांनी दिला.
जलसंपदा खात्याच्या कार्यक्रमात पत्रिकेत जाणीवपूर्वक नाव वगळल्याने भास्कर जाधव यांचा विस्फोट झाला आणि त्यांनी थेट सुनील तटकरे यांनाच लक्ष्य केले. नांदेडचे संपर्कमंत्री असताना तेथे पक्ष वाढविण्याकरिता जात नाहीत, पण रत्नागिरीत कायम लुडबुड कशाला करता, असा सवाल जाधव यांनी तटकरे यांना केला होता. तटकरे यांनी आपल्या मतदारसंघात अडवणूक सुरू केल्याची जाधव यांची भावना झाली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री यांमधील वादामुळे पक्षाबाहेरही विपरीत संदेश गेला होता. कोल्हापूरमध्ये सदाशिव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाद हाताबाहेर गेला आणि कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे नाक कापले गेले. ठाण्यातही पक्षाला गटबाजीचा फटका बसला. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता रायगड आणि रत्नागिरीतील वाद आणखी वाढू नये म्हणून स्वत: पवार यांनीच लक्ष घातले.
जाधव, तटकरे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्य़ातील जाधव यांचे विरोधक व राज्यमंत्री उदय सामंत यांनाही आज याबाबतच्या बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते. सुनील तटकरे गेली नऊ वर्षे आपली कशी कोंडी करतात, आपल्या विरोधकांना शक्ती देतात, रत्नागिरी जिल्ह्य़ात पक्षांतर्गत गटबाजी वाढवितात, असा तक्रारींचा सूर भास्कर जाधव यांनी लावला, तर तटकरे यांनी जाधव यांच्याबद्दलचा पाढा वाचला. दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पवार यांनी उभयतांना परिस्थितीची जाणीव करून दिली. प्रदेशाध्यक्षाने आपल्याच पक्षाच्या मंत्र्याच्या विरोधात जाहीर वक्तव्ये करणे चुकीचे असल्याची जाणीव पवार यांनी जाधव यांना करून दिली. तर प्रदेशाध्यक्षांचा मानसन्मान राखण्याबरोबर रत्नागिरीमध्ये नाक खुपसू नका, असा सल्ला तटकरे यांना देण्यात आला.   पवारांच्या सल्ल्यानंतर जाधव आणि तटकरे या दोघांनीही यापुढे न भांडण्याचा निर्धार केला.
रायगडवर दावा रायगड मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा करावा, अशी मागणी जिल्ह्य़ातील नेत्यांनी पवार यांच्याकडे केली. सहापैकी दोन आमदार राष्ट्रवादीचे असून, स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. एकही आमदार नसल्याने काँग्रेसला जागा सोडणे चुकीचे ठरेल, असा युक्तिवाद करण्यात आला.