राष्ट्रीय राजकारणात पवारांबद्दल चुकीचा संदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली होती, पण अजित पवार हे आपल्या पुत्राच्या उमेदवारीवर आडून बसल्याने मोठय़ा पवारांचा नाईलाज झाला. निवडणूक लढविण्याचा निर्णय बदलल्याने पवारांबाबत राष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश गेला आहे.

अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी गेल्या दिवाळीपासूनच केली होती. मतदारसंघात त्यांचे दौरे वाढले होते. अलीकडेच मतदारसंघात त्यांचे सर्वत्र फलक झळकले होते. पार्थ पवार हेच उमेदवार असणार हे नक्की झाले होते. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी पार्थच्या उमेदवारीच्या विरोधात मतप्रदर्शन केले होते. एकाच घरातील किती जणांनी निवडणूक लढवायची, असा सवाल केला होता. पार्थ यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असे पवारांनी म्हटले होते. पवारांच्या भूमिकेनंतर अजितदादांनी पूत्र लोकसभा लढणार नाहीत, असे सांगितले होते.

पुत्राच्या उमेदवारीवर अजित पवार मात्र ठाम होते. पार्थ यांचीही माघार घेण्याची तयारी नव्हती. सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून लढणार हे निश्चित होते. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. पार्थच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबियांमध्ये बराच खल झाला. एकाच घरातील तिघे रिंगणात उतरल्यास ते योग्य ठरणार नाही, असे पवारांनी बजाविले होते. अजितदादा आणि पार्थ हे माघार घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी पवारांनी स्वत:च निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. पवारांना हा निर्णय घेणे भाग पडले आहे.

सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर राजीनाम्याचा अजित पवार यांचा निर्णयही पवारांना पटला नव्हता हे त्यांच्या विधानांवरून सूचित झाले होते. तर ‘पक्षात निर्णय आपणच घ्यायचे, फक्त वरिष्ठांना त्याची माहिती द्यायची असते, असे एका कार्यक्रमाक व्यक्त होत अजित पवार यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपला शब्द महत्त्वाचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

कोणत्याच पक्षाला सरकार स्थापण्यासाठी पुरेसे संख्याबळ न मिळाल्यास नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरण्याची पवारांची योजना होती. यासाठीच पवारांनी लोकसभेत निवडून यावे, अशी नेत्यांची भूमिका होती. त्यातूनच पवार यांनी लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला होता. पण अजितदादांच्या पुत्र प्रेमामुळे पवारांना माघार घ्यावी लागली.

मुख्यमंत्र्यांचा पवारांना चिमटा !

‘शरद पवार हे बदललेल्या वाऱ्याची दिशा आधीच ओळखतात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच म्हटले होते. पवारांना देशातील बदललेल्या लाटेचा अंदाज आला असावा. त्यातूनच त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय बदलला असावा, असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawars withdrawal from ajit pawar son
First published on: 12-03-2019 at 01:47 IST