ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा कौल भावनांच्या आधारेच दिला. भावना भडकावणारा प्रचार अप्रामाणिक असतो आणि त्यास मिळणारे यशही तात्पुरते असते; परंतु त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. ‘बेग्झिट’मुळे ग्रेट ब्रिटनमध्ये उलथापालथी होतीलच; पण यामुळे युरोपीय संघावरही प्रश्नचिन्ह लागेल, असे मत मांडलेल्या ‘अंतारंभ’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

युरोपीय महासंघातून बाहेर पडावे किंवा नाही यावर जनमताचा कौल घेण्याची ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची खेळी चांगलीच अंगाशी आली. युरोपीय संघाचा बागुलबुवा उभा करणाऱ्यांच्या मागे जात बहुसंख्य ब्रिटिश जनतेने घटस्फोटाच्या बाजूने आपला कौल दिला. सर्वसामान्य जनतेस आर्थिक समीकरणे उमजत नाहीत. या घटस्फोटाचे परिणाम आर्थिक असणार आहेत. चिंतेची बाब अशी की, ब्रिटनपाठोपाठ अन्य देश उदाहरणार्थ ग्रीस किंवा स्कॉटलंड आदी देश घटस्फोटाची भाषा करू शकतात. याचे परिणाम गंभीर आहेत. मुळातच खंगलेली जागतिक अर्थव्यवस्था आता कुठे डोके वर काढेल अशी चिन्हे असताना हा घटस्फोट घडून आला, तो युरोपीय संघ या स्वप्नाच्या अंताचा आरंभ ठरेल असे विश्लेषण या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या  indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’चे स्तंभलेखक अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक श्रीकांत परांजपे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मताचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे.

 

लक्षात ठेवा..

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.