मुंबईतील हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावरील गोळीबारप्रकरणी पोलिसांनी पंजाबातील जालंधर येथून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
३ ऑक्टोबर रोजी वर्सोवा येथे हॉटेल व्यावसायिक शेट्टी यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळी झाडली होती. ती गोळी खांद्याला लागल्याने शेट्टी थोडक्यात बचावले होते. या प्रकरणी दिलीप उपाध्याय आणि तलविंदर सिंग पोलिसांना हवे होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके उत्तर प्रदेशातही जाऊन आली होती. पंरतु पोलिसांना चकमा देण्यात ते यशस्वी ठरले होते. गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाला हे दोघे जालंधर येथे असल्याची माहिती मिळताच त्यांना सापळा लावून अटक करण्यात आली. या दोघांना स्थानिक न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी दिली आहे. त्यांना मुंबईत आणून पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.कुख्यात गँगस्टर छोटा राजन याचा हस्तक सतीश थंगाप्पन उर्फ कालिया याने या हल्ल्याचा कट रचला होता. कालिया सध्या तुरुंगात आहे. याप्रकरणी पोलिसांनी धारावी येथील इस्टेट एजंट नित्यानंद नायक आणि सेल्विअन डॅनियल यांना अटक केली होती. शेट्टी यांची मुंबईसह दुबई आणि मलेशिया येथे हॉटेल्स आहेत. धारावी येथील एका पुनर्विकास योजनेच्या वादावरून हा
हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.