रे रोड येथे पावडरबंदर मध्ये भंगारासाठी आलेल्या जहाजाला शुक्रवारी सकाळी आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या आगीत जहाजावरचे पाच कर्मचारी किरकोळ जखमी झाले.   रे रोडच पावडरबंदर भागातील दारूखाना येथे अनेक जहाजे दुरुस्तीसाठी आणि भंगारात देण्यासाठी आणली जातात. सी व्ही रमण हे ८० फूट उंच तेलवाहू जहाज सुद्धा दुरूस्तीसाठी या ठिकाणी ठेवले होते. सकाळी अकराच्या सुमारास बोटीच्या तळघराला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ बंब आणि ६ पाण्याच्या टॅंकरच्या मदतीने आग विझविण्यात आली.
तळघरातून आग पसरत वरपर्यत पोहोचल्याने मोठा धूर तयार झाला होता. आग इंजिनापर्यत पोहोचली असती तर शेजारी उभ्या असलेल्या इतर जहाजांनासुद्धा आग लागली असती. या आगीत पाच कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.