|| संजय बापट

कर्ज प्रकरणाशी संबंधित खात्यांचा तपशील मागविला

गृहनिर्माण फेडरेशनच्या निवडणुकीवरून शिवसेना-भाजप संघर्ष  मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतही पोहोचला आहे. या बँकेच्या दोन शाखांमध्ये झालेल्या कर्ज वितरण घोटाळ्यावरून दोन्ही पक्ष  आमने- सामने आले असून  शिवसेनेने अंमलबजावणी संचालनालयाकडे(ईडी) धाव घेतली आहे. त्याची  दखल घेत संचालनालयानेही या शाखांमधील काही खात्यांबाबतची माहिती मागविली आहे.

बँकेतील पदाधिकाऱ्यांशी संबंधित काहींनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशोकवन दहिसर पूर्व आणि ठाकूर व्हिलेज कांदिवली पूर्व या दोन शाखांमध्ये शेकडो बनावट कर्जप्रकरणे करून कर्जदारांच्या खात्यावरील रक्कम आपल्या नावावर वळती करून घेतल्याचे प्रकरण काही महिन्यापूर्वी उघडीस आले होते. बँकेच्याच दक्षता विभागाने हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर नाबार्डनेही  अहवालात शाखाधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून कर्ज प्रकरणे मंजूर ठेल्याचा ठपका ठेवला होता. या प्रकरणात चौकशीअंती बँकेने दोन्ही शाखाप्रमुखांना सेवेतून बडतर्फ केले. त्यानंतर बँकेने कर्जदारांना वसुलीच्या नोटिसा पाठविल्या असून त्यावरून  वाद निर्माण झाला आहे.

या कर्ज प्रकरणात आपली फसवणूक झाली असून खात्यावर परस्पर कर्ज मंजूर करून ते पैसे काढून घेण्यात आल्याची तक्रार फर्स्ट प्लाइट कुरिअर कंपनीच्या २१कामगारांनी समतानगर पोलीस ठाण्यात तसेच बँकेकडे केली आहे. तर या कर्ज घोटाळ्यात बँकेतील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याने बँक त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. एवढेच नव्हे तर यात ‘मनी लाँड्रिंग’ झाल्याचा संशय व्यक्त करीत चौकशीची मागणी  बँकेचेच संचालक शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांनी  अंमलबजावणी संचालनालयाकडे केली आहे.  बँकेने ज्यांना कर्ज दिली त्यांनी ती मान्य केली असून आता वसुली सुरू झाल्याने नवा बनाव केला जात आहे असा आरोप दरेकर यांनी केला. तसेच ‘ईडी’ने  मागितलेली माहिती देऊ असे स्पष्ट केले

आरोप-प्रत्यारोप

या प्रकरणात कर्जदारांच्या खात्यावरून बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे नातेवाईक महेश पालांडे व अन्य काहींच्या खात्यावर रक्कम वळती झाली आहे. कर्जदारांनीही पालांडे आणि बँकेतील अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याची तक्रार केली असतानाही दरेकर यांच्या दबावामुळे  कारवाई होत नसल्याचा आरोप घोसाळकर यांनी केला आहे. या प्रकरणाशी आपला वा बँकेचा संबंध नाही. गृहनिर्माण फेडरेशनच्या निवडणुकीत पराभव झाल्याने वैफल्यातून घोसाळकर बदनामी करीत असल्याचा प्रत्यारोप प्रवीण दरेकर यांनी केला.