वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही पक्ष आक्रमक
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणात गणेशोत्सव मंडळेही भरडली जाऊ लागली असून, परस्परांना शह-काटशह देण्याकरिता गणेशोत्सव समन्वय समिती आणि गेल्याच वर्षी भाजपच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या महासंघांचा वापर करून ‘उत्सवी’ राजकारण सुरू झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाला १९८०च्या दशकात ओंगळ स्वरूप येऊ लागले होते. त्यातच एक तात्कालिक घटना गणेशोत्सव समन्वय समितीच्या स्थापनेला कारणीभूत ठरली. खेतवाडीमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची उंच गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर पडली आणि भग्न मूर्तीची देशी-विदेशी पर्यटक छायाचित्रे काढत होती. यावरून गिरगावमधील गणेशोत्सव मंडळांचा पर्यटकांशी वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेनंतर गिरगावमधील गजानन वर्तक, अरुण चाफेकर, रामचंद्र तेंडुलकर, शरद माहीमकर, बबन सावंत, नागेश पवार, पाडुरंग जाधव आदी मान्यवर मंडळी एकत्र आली आणि भविष्यात असे चुकीचे प्रकार घडू नयेत म्हणून त्यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.१९८२ मध्ये बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची स्थापना झाली. कालौघात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीचे काम सुरू झाले. गेली ३४ वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या समस्या, सरकारी यंत्रणांनी समन्वय साधण्यासाठी मध्यस्तीचे काम समन्वय समिती करीत आहे. अनेक वेळा समस्या सोडविण्यासाठी समितीने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची मदत घेतली आहे. मुंबईमध्ये आजघडीला ११ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यांचे प्रतिनिधित्व समन्वय समिती करीत आहे.गणेशोत्सवातील शिवसेनेचे हे वर्चस्व मोडून काढण्याच्या उद्देशाने आता जाहीर सभांमध्ये सेनेच्या खांद्यावर युतीचा हात टाकणारा भाजपच पुढे सरसावला आहे. भाजपने गेल्या वर्षी अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघाची स्थापना केली. यंदा या महासंघाची नोंदणी झाली असून सुमारे ५०० मंडळांनी महासंघाचे सभासदत्व स्वीकारले आहे. मुंबईमधील ३६ विधानसभा मतदारसंघांत महासंघाचे प्रत्येकी दोन याप्रमाणे ७० कार्यकर्ते कार्यरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी या महासंघाची स्थापना झाली आहे. हा महासंघ आक्रमक भूमिका घेत मंडळांमध्ये आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.राज्याच्या सत्तेचा फायदा घेऊन मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी महासंघाच्या माध्यमातून समन्वय समितीला शह देण्याचा प्रयत्न सुरू केला. तेथेच सारे बिघडले. समिती आणि महासंघात शीतयुद्ध सुरू झाले आहे. समितीचे खच्चीकरण करून शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण शिवसेना आपले वर्चस्व कमी होऊ देण्यास तयार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp politics on festival hit ganesh mandal
First published on: 24-08-2016 at 01:44 IST