आंबेडकर भवनप्रकरणी भारिप, शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी

दादर येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस बेकायदेशीररीत्या पाडण्यात सहभागी असलेले राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना पदावरून दूर करावे, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना व शिवसेना नेत्यांनी गुरुवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.

आंबेडकर भवन पाडल्याच्या विरोधात भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते. या संदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकर भवन पाडल्याच्या प्रकरणाची चौकशी करून, कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

या संदर्भात गुरुवारी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे, भारिपचे आमदार बळीराम शिरस्कर, महेश भारती, सुनील कदम, पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे प्रा. व्ही. एस. आसवरे आदींनी राज्यपालांची भेट घेऊन आंबेडकर भवन पाडण्यात रत्नाकर गायकवाड यांचा सहभाग असल्याची सीडी त्यांना दिली.

पदाच्या गैरवापराचा आरोप

गायकवाड यांनी पदाचा गैरवापर केला आहे, त्यामुळे माहिती अधिकार कायद्यातील कलम १७ तील तरतुदीनुसार त्यांना मुख्य माहिती आयुक्त पदावरून दूर करावे, अशी या नेत्यांनी राज्यपालांकडे मागणी केली. या प्रकरणात आपण लक्ष घालू, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे आमदार नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.