मुंबई : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये पळविणार का, असा प्रश्न भाजप नेते आशीष शेलार यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीमधील  शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मुंबईतील वित्तीय केंद्र गुजरातला पळवण्यासह भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांची यादी वाचत भाजपची भूमिका ढोंगीपणाची असल्याची टीका केली. तसेच भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध शेलार करणार का, असा सवालही केला.

वर्षभरापूर्वी मुंबईत आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा त्यावेळी निषेध का केला नाही. एवढेच नव्हे तर गुजरातचे मुख्यमंत्री आज मुंबईत आहेत, याचा निषेध आमदार आशीष शेलार कधी करणार आहेत, याची आम्ही वाट पाहतोय, असा सवाल उद्योगमंत्री व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी केला.

उद्योग वाढीसाठी आम्ही इतर राज्यांत जात नाही किंवा पळवापळी करत नाही तर परदेशात जातो. गुंतवणूक वाढवितो. उद्योग पळविण्यावर आमचा विश्वास नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे व ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या  बैठकीबाबत शेलार यांनी केलेली विधाने विसंगत आहेत. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असेल. परंतु भाजपची खरी पोटदुखी वेगळी आहे.  सध्या भाजप सर्व पातळींवर मागे पडत आहे. प्रादेशिक पक्ष पुढे जातील, या भीतीमधून असे वक्तव्य केले जात असल्याचे देसाई म्हणाले.

जेव्हा सर्व अर्थव्यवस्था ठप्प  होती तेव्हा महाष्ट्रातील उद्योग थांबू दिला नाही. ६० देशांसोबत कोटय़वधींचे सामंजस्य करार केले. नुकतेच दुबई येथील एक्सोमध्ये १५ हजार कोटींचे करार केले असे  देसाई यांनी सांगितले.

इतर राज्यांतील मुख्यमंत्री आले की ते उद्योगधंदे पळवायला आले असा अर्थ कसा निघू शकतो, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.  पूर्वीही अनेक राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. 

मुंबईच्या हक्काचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेल्याने यावर्षी देशात सगळय़ात जास्त परकीय थेट गुंतवणूक गुजरातला गेली जी महाराष्ट्रात आली असती. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व्हायब्रंट गुजरातसाठी गुंतवणूक घेऊन जाण्यासाठी मुंबईत उद्योजकांना भेटत आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.

ममतांना पायघडय़ा घालणे हा महाराष्ट्र द्रोह -शेलार

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे दूत म्हणून पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी काम केले, गुप्त भेटी घेतल्या आणि उद्योगपतींबरोबर बैठका आयोजित करून दिल्या, हा शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्रद्रोह असल्याचा आरोप भाजप आमदार आशीष शेलार यांनी केला.  शेलार म्हणाले, ममता बॅनर्जी या काँग्रेसचे अस्तित्व मानत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ऐकत नाहीत. या पक्षांमध्येच कोणाचाही पायपोस कोणाच्या पायात नाही आणि एकमेकांचे पटत नाही.