काही दिवसांपूर्वी स्टँड अप कॉमेडिअन कुणाल कामरानं जर संजय राऊत यांनी पहिली मुलाखत दिली तरच ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टचा दुसरा सीजन सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राऊतांनीही याला होकार देत कुणाल कामराला मुलाखत दिली. दरम्यान, या मुलाखतीत राऊत काय बोलले याची उत्सुकता सर्वांना होती. नुकतीच त्यांचं हे पॉडकास्ट प्रदर्शित झालं आहे. कंगना रणौत, भाजपा, ओवेसी यांच्यावर विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळेपणानं उत्तरं दिली. दरम्यान, यावेळी कंगनाचं ऑफिस तोडलेल्या जेसीबीला पद्मश्री दिला जाणार असल्याचा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौतनं राज्य सरकारवर केलेल्या आरोपांमुळे ती चर्चेत आली होती. मुख्यमंत्री, संजय राऊत याशिवाय अनेक प्रकरणांंवरून तिनं केलेली ट्वीट्स चर्चेचा विषय ठरत होती. तसंच मुंबईची तुलना तिनं पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं कंगनाचं कार्यालय अवैध असल्याचं सांगत तिच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली होती. यावर कुणाल कामरानं राऊत यांना सवाल केला.

“मी मुंबईला येत आहे. काय उखाडायचंय ते उखाडा असं कंगना म्हणाली होती. त्यामुळे तिच्या इच्छेप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेनं बुलडोझर चालवून उखाडून टाकलं. त्यानुसारच सामनानंही वृत्तांकन केलं आणि ‘उखाड दिया’ असं शीर्षकही दिलं.” असं राऊत म्हणाले. ज्या जेसीबीनं हे काम केलं त्याला पद्मश्री दिला जाणार असल्याचं म्हणत त्यांनी मिश्कील टोलाही लगावला. मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामं असून कंगानाच्या कार्यालयाचं बांधकानही अनधिकृत होतं. तिच्यावर झालेली कारवाई कायदेशीरच असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.