गुजरातचे निकाल म्हणजे माकडांनी सिंहाच्या कानफाटात मारण्यासारखे आहे. ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगत शिवसेनेने गुजरातमधील निकालांवरून भाजपला लक्ष्य केले. गुजरातमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष शिवसेनेच्या मार्मिक टीकेकडे लागले होते. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातू मंगळवारी भाजपला चिमटे काढण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाच्या पंतप्रधानांनाही शेवटी गुजरातच्या अस्मितेचेच कार्ड खेळावे लागले. ‘आपनो मानस’ म्हणूनच ९९ मतदारसंघांतील जनता मोदी यांच्या मागे उभी राहिली. पण किमान ७७ मतदारसंघांत राहुल गांधी व हार्दिक पटेल जोडीचा जय झाला. गुजरात व हिमाचलात भाजपचा विजय झाला, पण काँग्रेसचाही पराभव झाला नाही व काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण झाले नाही. हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा, असा उपरोधिक टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

या अग्रलेखातून शिवसेनेने काँग्रेस अध्यक्ष राहुल यांच्या कामगिरीचेही कौतुक करण्यात आले आहे. हिमाचल व गुजरातच्या निकालानंतर १९ राज्यांवर भाजपचा झेंडा फडकला आहे व काँग्रेस फक्त ५ राज्यांत म्हणजे ‘चिमूटभर’ उरली आहे. थोडक्यात, कधीकाळी काँग्रेसचे जे स्थान देशाच्या राजकारणात होते ते आता भाजपने घेतले आहे. या निकालाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर वारे बदलले नाहीत हे खरे, पण वारे मंदावले आहेत! उसळलेल्या लाटा थंडावल्या आहेत. अत्यंत परखडपणे बोलायचे तर, भाजप नेतृत्वासमोर राहुल गांधी, हार्दिक पटेल वगैरे कोण? ही तर माकडेच आहेत अशा ज्या वल्गना शेवटपर्यंत सुरू होत्या त्या मोडीत निघाल्या आहेत. पुन्हा ज्यांनी या वल्गना केल्या त्यांना काठावर पास होऊनही ‘डिस्टिंक्शन’ मिळवल्याचे उसने अवसान आणावे लागत आहे. हे चित्र केविलवाणे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

यशाचे द्वैत

तसेच सेनेने गुजरातमधील यशाबद्दल भाजपने आनंद साजरा करावा का, असा प्रश्नही उपस्थित केला. गुजरातमध्ये भाजपचा विजय झाला. विजय होणारच होता व जल्लोषाचे ढोल वाजविण्याची तयारी आधीच सुरू झाली होती. पण जल्लोष करावा, बेभान होऊन नाचावे इतका देदीप्यमान विजय भारतीय जनता पक्षास खरोखरच मिळाला आहे काय? विजय भाजपचा झाला असला तरी चर्चा मात्र राहुल गांधी यांनी मारलेल्या झेपेचीच आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजयाबद्दल आम्ही भाजपचे खास अभिनंदन करीत आहोत. त्याचबरोबर एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने जे यश संपादन केले तेसुद्धा महत्त्वाचे आहे. गुजरातेत भाजपला १५० पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही असे शेवटपर्यंत छातीठोकपणे सांगितले गेले. पण शंभराचाही आकडा गाठताना दमछाक झाली. किंबहुना शंभरचा आकडा गाठता गाठता भाजपचा घोडा मध्येच थांबतो की काय, अशीही एक वेळ आल्याचे अग्रलेखात सांगण्यात आले आहे.

भाजपला रोखले हा नैतिक विजयच !

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena take a dig on bjp over gujrat election 2017 results samna
First published on: 19-12-2017 at 07:35 IST