मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने आता महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, “मुंबई महापालिकेत पुन्हा शिवसेनेचा महापौर विराजमान होणार आणि शिवसेनेचाच भगवा फडकणार”, असा विश्वास व्यक्त केला.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “मुंबईकर निश्चितच शिवसेनेसोबत आहेत. कारण, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काम केलं आहे आणि आदित्य ठाकरे आज करत आहेत. आघाडी सरकार म्हणून काम करत आहेत. त्यामुळे मुंबईत लोकांच्या आशीर्वादावर आमचा भगवा राहणारचं.”
तसेच, “उद्यापासून आमची नवी इनिंग सुरू होणार, आम्ही ज्या प्रकार लोकांसोबत काम करत आहोत तसं करत राहू. आमचा कार्यकाळ संपला जरी असला तरी आमची पत संपलेली नाही. लोकांसाठी जे काम करायचं आहे ते आम्ही करतच राहू. जोपर्यंत दुसरा महापौर निवडून येत नाही तोपर्यंत मी मुंबईची जबाबदारी स्वत: घेईन. खुर्चीवर नाही बसणार पण जबाबदारी घेईन. कुठेही संकट आलं तरी मी तिथे पोहचेन. मी माझ्या मुंबईकरांना अर्ध्या वाटेत नाही सोडू शकत.” असंही पेडणेकर यांनी यावेळी सांगितलं.