मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास असून सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत लाचार होणार नाही. त्याचबरोबर उगाच कोणाची पालखीही शिवसेना वाहणार नाही. स्वाभिमानाने आणि स्वत:च्या पायावर खंबीरपणे पुढची वाटचाल शिवसेना करेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना दूरचित्रसंवादाद्वारे संबोधित केले. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष काँग्रेस वारंवार निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करीत असल्याच्या प्रकाराचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. तसेच सत्ताप्राप्तीसाठी आतुर विरोधकांवरही त्यांनी टीकास्त्र सोडले.

मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या न्याय्यहक्कांसाठी शिवसेनेचा जन्म झाला. स्वबळ हे केवळ निवडणुकीपुरते असत नाही. स्वबळ म्हणजेच आत्मबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शिवसेनेने आधी मराठी माणसाच्या हक्काची व नंतर हिंदुत्वाची लढाई लढली. सत्तेसाठी शिवसेना लाचार होणार नाही आणि उगाच कोणाची तरी पालखीही वाहणार नाही. स्वाभिमानाने आणि स्वत:च्या पायावर खंबीरपणे शिवसेना पुढची वाटचाल करेल, किंबहुना हेच शिवसेनेचे ब्रीद आहे, असा अप्रत्यक्ष इशारा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष आणि विरोधकांना दिला.

शिवसेनेने आजवरच्या वाटचालीत अनेकांचे रंग-अंतरंग पाहिले आहेत. अनेकजण आजकाल स्वबळाची घोषणा देत आहेत. स्वबळाच्या म्हणजेच आत्मबलाच्या आधारेच शिवसेनेने मराठी माणसाला न्याय मिळवून दिला. स्वबळ हा आमचा हक्कच आहे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी स्वबळ हवेच. नुकताच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेना उमेदवारांशी संवाद साधला त्यावेळी पराभव ही मानसिकता आहे आणि मनाने पडला तो संपला. संकटावर स्वबळाने चालून जाईल तोच शिवसैनिक हे समजावून सांगितले, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

शिवसेनेने मराठी माणसाच्या न्याय्यहक्काची भूमिका घेतली तर प्रांतवादी अशी टीका झाली. हिंदुत्व संकटात आल्यावर हिंदुत्वासाठी उभे राहिलो तर धर्मांध अशी टीका झाली. शिवसेनेसाठी हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आधी देशाभिमान हीच भूमिका आहे. भाषावार प्रांतरचना हा देशातील संघराज्य व्यवस्थेच्या शक्तीचा पाया आहे. त्यावर घाला घातला तर संघराज्य व्यवस्थेला धोका पोहोचतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बंगालने आणि बंगाली लोकांनी स्वत्व काय असते हे दाखवून दिले आणि प्रादेशिक अस्मिता कशी जपावी याचे उदाहरण देशाला दाखवले, असेही ठाकरे म्हणाले.

करोनामुक्त गाव आणि करोनामुक्त प्रभाग मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे. तसे झाल्यास शहर-जिल्हा आणि राज्य करोनामुक्त होईल, असे आवाहन ठाकरे यांनी के ले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक के ले तर आदेश बांदेकर यांनी सूत्रसंचालन के ले.

‘त्यांच्या’ पोटदुखीवर  राजकीय औषध करू!

करोना काळात सरकारने चांगले काम के ल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे. सत्तेबाहेर राहावे लागल्याने त्यांना सारखा त्रास होतो. सत्तालोलुपता आणि त्यासाठीचे विकृत राजकारण सुरू आहे. त्यांना राजकीय औषध देणारच आहे. के वळ शिवसेनेवर आरोप करायचे, बदनामी करायची आणि पळून जायचे हे उद्योग सुरू आहेत. पण हे करणारे स्वत: कोण आहेत, तुमचे चारित्र्य चांगले आहे का, ते आरशात पाहा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर के ली. सत्ता पाहिजे हा अट्टहास सुरू आहे. शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नव्हती. तसे असते तर ती टिकली नसती, असेही त्यांनी सुनावले.

…तर लोक जोड्याने मारतील

करोनावर के वळ नियंत्रण आल्याने प्रश्न सुटणार नाहीत. कोविडोत्तर आरोग्य आणि आर्थिक समस्या मोठ्या आहेत. येत्या काळात आपले कसे होणार, अशी चिंता बहुसंख्य जनतेला आहे. या आर्थिक प्रश्नांकडे देशात कोणाचे लक्ष नाही. के वळ सत्ताप्राप्ती आणि निवडणुकांचे राजकारण हा विकृत खेळ सुरू राहिला तर देशातील आर्थिक परिस्थिती बिघडेल व देशात अस्वस्थता पसरेल. लोकांच्या अडचणी सोडवण्याचा विचार न करता राजकीय पक्ष स्वबळाच्या घोषणा देत बसले, तर लोक जोड्याने मारतील,  असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena chief minister uddhav thackeray self esteem telecommunication marathi manus justice of maharashtra akp
First published on: 20-06-2021 at 01:34 IST