रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचं कारण नाही असं ते म्हणाले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत असं सांगत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचं समर्थन केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

“महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत. त्यामुळे जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. त्याच्याशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचं कारण नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“रिपब्लिकने आम्हा सर्वांविरोधात बदनामीची मोहीम चालवली होती. खोटे आरोप केले होते. खोटे आरोप होत असतील तर त्याचाही तपास झाला पाहिजे असं आम्ही म्हटलं होतं. आता कोण काय म्हणालं याचं स्पष्टीकरण मी देण्यासाठी आलेलो नाही,” असं यावेळी ते म्हणाले.

अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर कंगना ठाकरे सरकारवर संतापली; म्हणाली…

“पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचं मला वाटत नाही. पत्रकारांनीही आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असताना मर्यादा पाळल्या पाहिजेत. सुप्रीम कोर्टाने त्या चॅनेलसंबंधी काय सांगितलं आहे ते समजून घ्या. तुम्ही न्यायालय किंवा तपास यंत्रणा नाही. तुम्ही कोणाविरोधातही काहीही सांगून लोकांची दिशाभूल करु शकत नाही. सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण मोंदवलं असताना त्यांनाही हा काळा दिवस आहे विचारणार का?,” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

“चुकीचं काम केलं नसेल तर मग तो पत्रकार, राजकीय नेता, अभिनेता कोणीही असो ओरडण्याचं कारण नाही. या देशात प्रसारमाध्यमांना सर्वात जास्त स्वातंत्र्य आहे. इतकं स्वातंत्र्य कुठेच नाही. युपीमध्ये पत्रकारांवर कठोर कारवाई केली जाते त्याबद्दल कोणी बोलत नाही,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. कंगनाच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी येथे कोणाचाच आवाज दाबला जात नसल्याचं सांगितलं. महाराष्ट्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करणारं राज्य आहे, त्यामुळे असं बोलण्याचं कारण नाही असं ते म्हणाले.

अर्णब गोस्वामी यांना अटक कशासाठी ?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

रिपब्लिकचा काय दावा-
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.

अर्णब गोस्वांमी यांनी १० पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि संजय पाठक यांना घरात जाण्यापासून रोखल्याचंही सांगण्यात आलं आहे. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहनं आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपब्लिकचा दावा आहे.