जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्याविरोधातील राष्ट्रद्रोहाचा खटला आणि त्याला मिळालेल्या जामीनानंतर त्याने विविध ठिकाणी केलेल्या भाषणांवरून केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने सोमवारी भाजपला चिमटा काढला. कन्हैया कुमारला फुकटची प्रसिद्धी मिळत असली, तरी त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नच शिवसेनेने भाजपला विचारला आहे. त्याचबरोबर कन्हैया कुमारला जास्त काळ आत ठेवल्याने सरकारला जड गेले असते व अनेक प्रश्‍नांना तोंड द्यावे लागले असते याचा उल्लेख करीत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखामध्ये सोमवारी कन्हैया कुमारच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. या अग्रलेखात म्हटले आहे की, कन्हैया कुमार याला फुकटची प्रसिद्धी मिळत आहे असा टोला व्यंकय्या नायडू यांनी मारला. विद्यार्थ्यांनी शिकावे, आंदोलने व राजकारण करू नये असे नायडू यांनी म्हटले आहे. कन्हैया यास फुकटची प्रसिद्धी मिळते असे नायडू यांचे म्हणणे असेल तर त्यास कोण जबाबदार आहे? सध्या आपल्या देशात काहीच फुकट मिळत नाही व लहानसहान गोष्टींचीही जबर किंमत मोजावी लागते. मजूर वर्ग, कामगार वर्गाच्या कष्टाच्या ‘प्रॉव्हिडंट फंडा’च्या पैशांवरही सरकारने आता कर लावला. म्हणजे थोडक्यात देशासाठी राबणार्‍या श्रमिकांच्या घामावरही कर लावून ‘फुकट काही नाही’ हेच सरकारने दाखवून दिले. पुन्हा प्रसिद्धी माध्यमातही जे विकते तेच पिकवले जाते. कन्हैया याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे व तरीही त्यास फुकट प्रसिद्धी देण्याची स्पर्धा सुरू असेल तर सरकारने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी.
सरसंघचालक मोहन भागवत यांनीही ‘‘सध्याच्या तरुणांना देशभक्ती शिकवावी लागते, ‘भारतमाता की जय’ असे वदवून घ्यावे लागते,’’ अशी खंत अलीकडेच व्यक्त केली. त्याचा उल्लेख करून, देशातले वातावरण झपाट्याने बदलत आहे. निवडणुका लढवणे व येनकेन मार्गाने त्या जिंकून सत्ता स्थापन करणे हेच एकमेव ध्येय बनले आहे. निवडणुकीआधी दाखवलेली स्वप्ने हवेत विरून जातात व शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी त्याच वैफल्यग्रस्ततेचे शिकार होतात. युवा शक्तीचे नैराश्य हे असेच वाढू लागले तर पाकिस्तानमधून अतिरेकी न घुसताही स्वदेशात ‘स्फोट’ वाढू लागतील, अशी भीतीही अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.