‘मॅजेस्टिक गप्पां’मध्ये देवदासींची कैफियत
वयाच्या नवव्या -दहाव्या वर्षांपासून हे आयुष्य स्वीकारल्यानंतर आमचे घर सुटले. त्यानंतर ना समाजाने ना राज्यकर्त्यांनी आणि तथाकथित देवानेही आम्हाला स्वीकारले नाही. त्यामुळे वंचितांचे जगणे आणि वंचितांचे मरणे हे आयुष्य आमच्या नशिबी असल्याची खंत जोगते आणि देवदासींनी विलेपार्ले येथे ‘मॅजेस्टिक गप्पां’मध्ये व्यक्त केली.
बळीराम कांबळे, तानाजी पाटील या जोगत्यांनी व सुशिला नाईक, नंदा पारकर या देवदासींनी भूतकाळातील वेदनांना मोकळी वाट करून दिली. आमच्यासारखे जगणे आमच्या पुढील पिढीच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून आम्ही आता लढत आहोत आणि ही लढाई जिंकणे हेच आमच्या आयुष्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
देवदासी, जोगते आणि जोगतीणी यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची दखल कोणालाही घ्यावीशी वाटत नाही, अशी खंत या चळवळीत काम करणारे प्रा. विठ्ठल बन्न्ो यांनी व्यक्त केली.
महिलांवरील अत्याचार, त्याच्या विरोधात उभे ठाकणारे नागरिक आणि विविध संघटना, शासनाने याकडे दिलेले लक्ष, या अत्याचाराच्या विरोधात होणारे सुधारित कायदे हे एकीकडे असताना देवदासी, जोगते आणि जोगतिणींवर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेण्यात येत नाही, असेही बन्ने म्हणाले.
देवदासी आणि जोगत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी गेली चाळीस वर्षे राज्य शासन व लोक परंपरांशी  झगडणाऱ्या बने यांनी वंचितांचे हे जग श्रोत्यांसमोर उलगडले.