अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे.

एनसीबीचे विशेष पथक तपासासाठी मुंबईत आले आहे. या पथकातील अधिकारी के.पी. एस. मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूड किंवा मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा (बड/गांजाचे प्रतिनाम) विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली. शोविक अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या संपर्कात होता, हे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
एनसीबीने गुरुवारी अटक आरोपी झैद याला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. झैदने चौकशीदरम्यान त्याच्याकडून अमली पदार्थ विकत घेणाऱ्या अनेक व्यक्तींची नावे घेतली आहेत. या माहितीची खातरजमा करण्यासाठी झैदची पोलीस कोठडी अत्यावश्यक आहे.

विशेष पथकाकडून सुशांतच्या मृत्यूत अमली पदार्थाच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक चौकशीतून हाती लागलेल्या माहितीची शहानिशा आणि सखोल तपास आवश्यक आहे. त्याआधारेच सुशांतच्या मृत्यूसोबत बॉलीवूडला अमली पदार्थ पुरवणारी विक्रेत्यांची टोळी शोधून काढणे शक्य होईल, असे सांगत एनसीबीने आरोपी झैद याला पोलीस कोठडीत पाठवावे, अशी मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने झैदला ९ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

झैद याचे वकील अॅलड. तारक सय्यद यांनी सुनावणीनंतर दिलेल्या प्रतिक्रि येत एनसीबीने आपल्या अशिलाचा जबाब बळजबरी लिहून घेतल्याचा दावा केला. तसा अर्जही न्यायालयासमोर सादर केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रियाचे वडील इंद्रजीत यांची गुरुवारी पुन्हा चौकशी केली.

सीबीआयच्या विशेष पथकाने गुरुवारी मानसोपचारतज्ञ सुजॅन वॉकर यांच्याकडेही चौकशी के ली. वॉकर यांनी सुशांतवर उपचार केले होते. सुशांतवर मानसोपचारतज्ञांकडून उपचार सुरू होते ही बाब मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली होती. १४ जूनला सुशांतच्या मृत्यूनंतर निवासस्थानी मानसोपचारतज्ञांची चिठ्ठी पोलिसांना आढळली होती. उपचार करणाऱ्या मानसोपचारतज्ञांकडे पोलिसांनी विचारपूस केल्यावर सुशांतने मानसिक विकारातून टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली होती. मात्र वडील के.के. सिंह यांनी केलेल्या आरोपांनुसार सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचारतज्ञांनी कुटुंबाला विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे वॉकर यांची सीबीआय चौकशी महत्त्वाची मानली जात आहे.

झाले काय?

* एनसीबीने गेल्या आठवडय़ात अब्बास, करण यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५६ ग्रॅम गांजा हस्तगत केला होता. त्यांच्या चौकशीतून झैद आणि परिहार यांची नावे पुढे आली.
* झैद वांद्रे येथे वास्तव्यास आहे. त्याच्या निवासस्थानाहून सुमारे साडेनऊ लाख रुपये, अमेरिकन डॉलर, ब्रिटनचे पाऊंड, अरब अमिरातीचे दिऱ्हाम हस्तगत करण्यात आले.
* झैद वांद्रे येथे हॉटेल चालवत होता. टाळेबंदीत हॉटेल बंद झाल्याने त्याने अमली पदार्थाची विक्री सुरू केली, अशी माहिती चौकशीतून पुढे आल्याचा दावा एनसीबीने केला.
* या चौघांचे भ्रमणध्वनी एनसीबीने तपासासाठी ताब्यात घेतले असून त्याद्वारे आरोपीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, आरोपींनी समाजमाध्यमांद्वारे साधलेला संवाद, आर्थिक व्यवहारही तपासले जात आहेत.